Published On : Tue, Jan 16th, 2018

विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनामुळे अभ्यासू, अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआडः खा. अशोक चव्हाण

Farande
मुंबई: विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनामुळे अभ्यासू, अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, अध्यापनाचे कार्य करत असतानाच फरांदे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. राज्याचा चौफेर अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. विधानपरिषदेचे आमदार म्हणून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. विधानपरिषदेचे उपसभापती आणि सभापती म्हणून काम करताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतला संवाद कायम ठेवला.

प्र. ना. स. फरांदे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी फरांदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.