
नागपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू व रोटी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रोहित माडेवार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून डॉ. रोहित माडेवार यांना पक्षात प्रवेश दिला.
याप्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री तथा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम, शहर संघटनमंत्री सुनील मित्रा, दक्षिण पश्चिम नागपूरचे अध्यक्ष किशोर वानखेडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
रोटी फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून व विमुक्त भटक्या जातीचे प्रतिनिधी म्हणून डॉ. माडेवार ह्यांनी संपूर्ण विदर्भात कार्य केलेले आहे, हे लक्षात घेता त्यांनी भविष्यात त्याच दृष्टीने कार्य करावे, अशी अपेक्षा देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
विमुक्त भटक्या जाती आपल्या प्रश्नांसंदर्भात अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. या अनेक वर्षांच्या संघर्षाला न्याय मिळवून देऊन लढा यशस्वी करण्याची क्षमता विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात खांद्याला खांदा लावून काम करणार, असा विश्वास यावेळी डॉ. रोहित माडेवार यांनी व्यक्त केला.
पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम धर्मपाल मेश्राम ह्यांच्या पुढाकारातुन घेण्यात आला.


