Published On : Wed, Jul 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

प्रदेशाध्यक्षपदाच्या प्रवासात काही त्रुटी राहिल्या असतील तर क्षमा करा; महसूल बावनकुळे यांचं भावनिक पत्र

Advertisement

मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदात बदल झाले असून, कार्यकारी अध्यक्षपद भूषवणारे रविंद्र चव्हाण यांची नव्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावुक पत्र लिहीत आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे. या पत्रातून त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांचे आभार मानले असून, कुणाला दुखावले असल्यास दिलगिरीही व्यक्त केली आहे.

पत्रात बावनकुळे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितलं की, “मी अगदी सामान्य पार्श्वभूमीतून आलो असून, सार्वजनिक जीवनाची सुरुवात समाजातील प्रश्नांना वाचा देण्यासाठी केली. कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी भिंती रंगवणं, पत्रके वाटणं, गावोगाव पायी प्रवास करणं हे माझं प्रारंभिक काम होतं. अशा परिस्थितीतून थेट प्रदेशाध्यक्षपद गाठणं हे स्वप्नवत वाटतं.”

ते पुढे म्हणाले की, “१२ ऑगस्ट २०२२ रोजी जेव्हा मला पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा अभिमानासोबत मोठं दडपणही होतं. पक्षाची पायाभरणी करणाऱ्या दिग्गज नेत्यांचा वारसा पुढे नेण्याचं आव्हान माझ्यापुढे होतं. मी महाराष्ट्रभर सतत दौरे करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.”

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्या कार्यकाळात झालेल्या निवडणुकांचा आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केलं की, “लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही, पण त्यातून शिकून विधानसभेत मोठं यश मिळवण्यात आपण यशस्वी ठरलो. भाजप- महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं, याचं श्रेय केवळ कार्यकर्त्यांचं आहे.”

बावनकुळे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा गौरव करत म्हटलं की, “मोदींसारख्या नेत्याच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पक्षाच्या विचारसरणीतून देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान वाटतो.”

पत्राच्या शेवटी बावनकुळे यांनी नम्रपणे माफी मागितली. “मी अध्यक्ष म्हणून काम करत असताना काही त्रुटी राहिल्या असतील, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून क्षमा मागतो. आपल्या सर्वांच्या साथीने मी ही जबाबदारी निभावू शकलो, त्याबद्दल कृतज्ञ आहे. पुढेही पक्षासाठी निष्ठेने कार्यरत राहीन,” असं ते म्हणाले.

Advertisement
Advertisement