Published On : Fri, Jun 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या देवळी पेंढारी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा वन विभागाकडून रेस्क्यू

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील देवळी पेंढारी शिवारात एका शेतात असलेल्या विहिरीत आज सकाळी एका बिबट्याचा अचानक पडल्याचा प्रकार समोर आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा यशस्वी बचाव केला.

ही घटना देवळी पेंढारी गावातील रमेश उईके यांच्या शेतातील विहिरीत घडली. सकाळी सुमारे ११ वाजता काही शेतकऱ्यांनी विहिरीत हालचाल पाहिल्यानंतर जवळ जाऊन पाहिलं असता, त्यांना बिबट्या दिसला. लगेचच गावाचे माजी सरपंच पंकज तेलंग यांनी कवडास येथील वन विभागाला याची माहिती दिली.

Gold Rate
11 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,800/-
Gold 22 KT ₹ 1,13,300/-
Silver/Kg ₹ 1,66,700/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तीन तासांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी रेस्क्यू-
आरएफओ शालिनी शिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एच. डी. भेंडे, एच. एन. भूरे, टीटीसीची डॉ. प्रियल चौरागडे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला विहिरीबाहेर सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.

उपचारासाठी नागपूरला हलवले; नंतर नैसर्गिक अधिवासात सोडणार
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्याची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. उपचारानंतर रात्री उशिरा त्याला परत जंगलात सोडण्यात येणार आहे.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांत वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढल्या असून दोन दिवसांपूर्वी एका अस्वलाने आपल्या दोन बछड्यांसह नदीपाशी हजेरी लावली होती. त्यामुळे तेंदुआ त्यांचाच पाठलाग करत असताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटना वाढत चालल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Advertisement