Published On : Thu, Jul 12th, 2018

जनतेच्या हितासाठी दोन्ही सभागृहांचे कार्य महत्त्वाचे – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

नागपूर : संसदीय लोकशाहीमध्ये विधान मंडळाच्या सभागृहांना महत्वाचे स्थान आहे. दोन्ही सभागृहांचे कार्य महत्त्वाचे आहे. विधानसभेत प्रत्यक्षरित्या जनतेकडून लोकप्रतिनिधींची निवड होते. विधानपरिषदेत पदवीधर शिक्षक, कला वाणिज्य, स्थानिक स्वराज्य संस्था निवड केली जाते. दोन्ही सभागृहांनी समन्वयाने काम केल्यास जनतेचे हित साध्य होण्यास मदत होते.

त्यामुळे दोन्ही सभागृहाच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. घाईगडबडीमध्ये एखादे विधेयक मंजूर होऊ नये यासाठी विधानसभेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य विधानपरिषद करत असते.

लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाची ध्येय धोरणे जनतेच्या हिताच्या दृष्टिने अन्यायकारक असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही सभागृहे महत्वाची भूमिका बजावतात, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्वपूर्ण योगदान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी आमदार विनायक मेटे प्रधान सचिव अनंत कळसे, सभापतींचे सचिव म.मु.काज, अवर सचिव सुनील झोरे, राज्यातील विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

श्री नाईक-निंबाळकर म्हणाले, सभागृहाच्या सदस्यांनी लोकांनी दिलेल्या संधीचा फायदा स्वत:साठी न करता जनतेच्या हिताच्या दृष्टिने करावा. तसेच ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेऊन सदनाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतात सात राज्यात विधानपरिषद आस्तित्वात आहेत. राज्याने ठरविले तरच विधानपरिषद आस्तित्वात येते. विधानपरिषदेत पदवीधर शिक्षक, कला वाणिज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अप्रत्यक्षरित्या 78 सदस्यांची निवड केली जाते. दोन्ही सभागृहांनी समन्वयाने काम केल्यास जनतेचे हित साध्य होण्यास मदत होते.

प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्पर्धा वाढली आहे. आज तरुण पिढीच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असून स्वत:च्या तंत्रज्ञानाचा वापर करुन समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकारणात येण्यासाठी पुढाकार घ्यावा. आमदार होऊन तुमच्या नवीन कौशल्याचा लाभ राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणासाठी व्हावा. भविष्यामध्ये तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्येकाने विचार करुन मतदान केले पहिजे. या मतदानाचा परिणाम भविष्यावर होणार आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पहिजे, असेही श्री. नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

सभापती किंवा अध्यक्ष म्हणून आपल्या पदावर असताना पक्षीय दृष्टिकोन न ठेवता तटस्थ भूमिका ठेऊन जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावण्याचे कार्य पार पाडले जाते.

यानंतर सभापती व अध्यक्ष यांच्या उपस्थितीत 48 व्या, राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गाचा अखेरचा दिवशीविद्यार्थांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

प्रास्ताविक आमदार विनायक मेटे यांनी केले तर आभार राष्ट्रसंत तुकडोची महाराज, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका रिता धांडेकर यांनी मानले.