Published On : Thu, Dec 23rd, 2021

महाकाली भक्तांच्या पवित्र स्नानासाठी मनपाने केली झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता

Advertisement

चंद्रपूर : शहरातील माता देवी महाकालीच्या मंदिरात मार्गशीष महिन्यानिमित्त मराठवाडा, आंध्र प्रदेश व तेलंगणा येथून भाविकांची गर्दी होत आहे. भाविक भक्तांना नदीच्या पात्रात पवित्र स्नान करता यावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून झरपट नदीच्या पात्राची स्वच्छता करण्यात आली.

चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भक्तगण चंद्रपूर शहरात वर्षभर येत असतात. सध्या मार्गशीष महिन्यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भक्तांची गर्दी वाढू लागली आहे.

येथे येणारे भाविक दर्शनापूर्वी झरपट नदीत पवित्र स्नान करतात. येथे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने झरपट बंधाऱ्यावर पडलेला साबण, कागद, प्लास्टिक व इतर कचरा स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उचलला. श्री महाकाली मंदिर येथे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नदीच्या काठी व जलपात्रात कचरा आणि प्लास्टिक पिशव्या टाकू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.