महापौरांनी केले राजमाता जिजाऊंना अभिवादन
नागपूर : मुघल साम्राज्याला हद्दपार करून रयतेच्या राज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी मनात पेरण्याचे अलौकिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजींसारखा लोकांचा राजा, जाणता राजा निर्माण होण्यामागे राजमाता जिजाऊंचे मौलिक योगदान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रजतेच्या राज्याची संकल्पना पूर्णत्वास आणायची असेल, प्रत्येक घरातून शिवाजींचा आदर्श प्रवाहित करायचा असेल, एक सक्षम राष्ट्र निर्मिती करायची असेल तर प्रत्येक मातेने राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १२) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये महापौर नंदा जिचकार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक राजेश वासनिक, धनंजय तापस, प्रमोदिनी तापस, शुद्घोधन घुटके, शुभम पिंतुरकर, मनोज मिश्रा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, देशाचे भविष्य असणा-या बालमनावर आज योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊंनी शिवबाला घडविताना बालपणापासूनच त्यांच्या मनावर राष्ट्रनिर्माणाचे धडे गिरवले. थोरपुरूषांच्या गोष्टी, युद्धनीतीचे धड्यांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची निर्मिती करू शकले. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच संभाजी महाराजांनाही घडविले. मात्र वेळप्रसंगी त्यांनी कठोर पाऊलेही उचलली. अशा कणखर मातेमुळेच छत्रपती शिवबांनी सक्षम राष्ट्राची निर्मिती केली. आजही सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी अशाच कणखर मातृत्वाची गरज आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.