Published On : Tue, Jun 18th, 2019

महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी सर्वसमावेशक ‘डीपीआर’ करावा – देसाई

मुंबई : महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी मंदिर ट्रस्ट आणि म्हाडाने संयुक्तरित्या विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, भाविकांसाठी सर्व सोई-सुविधा आणि परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांचा यामध्ये विचार करण्यात यावा,अशा सूचना उद्योगमंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केल्या.

महालक्ष्मी मंदिर आणि परिसराला श्री. देसाई यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
मंदिर परिसरातील जुन्या इमारतींचा विकास जरीवाला मॅन्शनच्या धर्तीवर अतिरिक्त एफएसआय देऊन करता येईल, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, जुन्या इमारतींच्या बाबतीत मंदिर समिती व स्थानिकांच्या हक्काला बाधा येणार नाही याची शासन काळजी घेईल. सुनियोजित विकासासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या झोपडपट्टीचा पुनर्विकासही आवश्यक आहे.

Advertisement

ते पुढे म्हणाले, मंदिराच्या मागे समुद्राच्या बाजूने गेट वे ऑफ इंडिया परिसराप्रमाणे विकास करण्यास वाव आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी येण्या-जाण्यास पुरेशी जागा उपलब्ध होण्यासह मंदिराला चारही बाजूने रस्त्यांनी जोडणे शक्य होईल. अशा स्थितीत मंदिरासमोरील पूजासाहित्य विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. मंदिर मागील बाजूने कोस्टल रोडशी जोडता येईल का या पर्यायाबाबतही विचार करण्यात येईल, असेही श्री. देसाई यावेळी म्हणाले.

यावेळी श्री. देसाई यांनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्यावतीने श्री. देसाई यांचे स्वागत करण्यात आले. वास्तूविशारद श्रीमती लांभा यांनी मंदिर परिसर विकासाबाबत बनविलेल्या आराखड्याची माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगरसेविका सरिता पाटील, म्हाडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे मुख्याधिकारी शहाजी पवार,बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, मंदिर समितीचे विश्वस्त विजय गोखले, विजय गूपचूप, वास्तूविशारद आभा लांबा आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement