Published On : Sat, Jan 19th, 2019

‘जनसंवाद’ मधील तक्रारींचा पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा

गांधीबाग व सतरंजीपुरा झोनच्या विविध विषयांसंदर्भात बैठक

नागपूर : नागपूर महानगरपालिकेंतर्गत गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये घेण्यात आलेल्या ‘जनसंवाद’मधील शासन स्तरावरील तक्रारींचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला. यासंबंधी शनिवारी (ता.१९) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध तक्रारींसंदर्भात आढावा बैठक घेतली.

बैठकीमध्ये महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अभिजीत बांगर गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, परिवहन उपसभापती प्रवीण भिसीकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक संजय चावरे, राजेश घोडपागे, प्रकाश भोयर, महेश महाजन, नितीन साठवणे, जुल्फेकार अहमद भुट्टो, रमेश पुणेकर, नगरसेविका अभिरूची राजगिरे, सरला नाईक, सुमेधा देशपांडे, शकुंतला पारवे, श्रद्धा पाठक, आशा उईके, अंसारी सय्यद बेगम मो. निजामुद्दीन, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकार कार्यकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, राजेश भुतकर, सहायक आयुक्त विजय हुमने, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, पोलिस विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्त्याचे बांधकाम, अतिक्रमण, पाणी पुरवठा, पार्किंग, कचरा घर यासह नागरिकांच्या विविध तक्रारींवर विस्तृत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अडचणी दूर करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

गांधीबाग झोनमधील मासोळी व मटन मार्केट स्थानांतरणासंदर्भात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गंत कळमना येथे जागा देण्यात आली असून या प्रस्तावावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. लकडगंज येथील मनपा जागेमधील अतिक्रमणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी असामाजिक तत्वांचा वावर असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. मनपा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात ७ दिवसात पूर्ण अतिक्रण काढून संबंधित जागेवर पुन्हा अतिक्रमण होउ नये यासाठी योग्य कार्यवाही करण्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केले.


पाणी पुरवठा सुरक्षित ठेवण्यासंदर्भातील तक्रारीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाने येत्या काळात पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने गांभिर्याने दखल घेण्याचे निर्देश दिले. शहरातील विहिरींची योग्य स्वच्छता करून प्रत्येक विहिरीचे पाच मिटर खोलीकरण करणे तसेच विहिर व बोअरवेलवर पम्प बसवून लघुनळ योजना राबवून नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करणे. पाणी हे जीवन असून पाण्याला प्रथम प्राधान्य देत याबाबत कार्य करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.

संत्रा मार्केट येथील कचरा घर हटवून रामझुल्याखालील रेल्वेच्या जागेमध्ये कचरा ट्रान्सफर स्टेशन बनविण्याबाबत रेल्वेला पत्र देउन परवानगी घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय गर्दीच्या ठिकाणचे रस्ते रूंदीकरण, पार्किंगसाठी पी१ व पी२, रेल्वे क्रॉसिंगवर पादचारी पूल, अतिक्रमण, असामाजिक तत्व, वक्त बोर्ड, डीसीआर नियम बदलणे, शहरातील सीसीटीव्ही, ऐवजदारांना स्थायी नोकरी अशा विविध तक्रारींसंदर्भातही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली व पुढील बैठकीमध्ये या विषयांवर योग्य कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.