Published On : Tue, Apr 21st, 2020

सामाजिक अंतर पाळा, कोरोनाची साखळी खंडीत करा!

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आवाहन

नागपूर: आज जगभर कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. जगातील २०० पेक्षा जास्त देशात कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे माणसापासून माणसापर्यंत हा आजार पसरतो. एक रुग्ण ४०० ते एक हजार लोकांना कोरोनाबाधित करू शकतो. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करायचे असेल तर त्यावर एकमेव उत्तम उपाय म्हणजे कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येण्यापासून रोखणे आवश्यक आहे. घरातही दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटाचे अंतर राखणे गरजेचे आहे. आज नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येला अशाच संसर्गाची पार्श्वभूमी आहे. एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवाचा असेल, ही साखळी खंडीत करायची असेल तर प्रत्येकाने सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडीत होणार?’ या विषयावर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी मंगळवारी (ता. २१) नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.

कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र अजूनही बहुतांशी लोक लॉकडाउनला गांभीर्याने घेत नाहीत. प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सारेच घरात राहण्याचे आवाहन करित आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केल्यास कोरोनापासून बचावाचा उत्तम उपाय घरी राहणे हाच आहे. कोरोना संशयित आढळल्यानंतर त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी संशयीताच्या संपर्कात येणा-यांचा शोध घेउन त्यांची संपूर्ण ‘हिस्ट्री’ शोधून त्यांनाही ‘क्वारंटाईन’ करणे का आवश्यक आहे, ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत त्यांनी दिली. यासह नागरिकांकडून विचारण्यात येणा-या प्रश्नांचेही त्यांनी सोप्या भाषेत समाधान केले.

नागपूर शहरात आतापर्यंत रुग्णांची संख्या किती आहे व ती पुढे वाढेल का, या प्रश्नाला उत्तर देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपूर शहरात आतापर्यंत ८६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. संसर्गामुळे कोरोना वाढतो आहे. सतरंजीपुरा येथील एका रुग्णामुळे शहरात सर्वाधिक संसर्ग वाढला आहे. या एकट्या रुग्णामुळे ४४ जण कोरोनाबाधित झाले आहेत. या रुग्णाशी संबंधित शंभरावर चाचणी अहवाल प्रतिक्षेत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता अधिक जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. घरी राहूनच कोरोनाची साखळी खंडीत होउ शकते त्यामुळे सर्वांनी घरीच राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

…तर ५०० रुपये दंड
अनेक भाजी विक्रेते मास्क वापरत नसल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे अत्यावश्यक आहे. भाजी विक्रेते असो अथवा सामान्य नागरिक घराबाहेर पडणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक आहे. शहरात कुणीही मास्कविना आढळल्यास त्याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा विचार मनपा प्रशासन करत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय सकाळी व सायंकाळी अनेक भागात बरेच लोक फिरायला निघत असून त्यांच्यावर मनपातर्फे करण्यात येणा-या कारवाई संदर्भात सांगताना ते म्हणाले, ‘मॉर्निंग’ आणि ‘इव्‍हिनींग वॉक’ करणा-यांवर कारवाई सुरू आहे. अनेक वाहनेही जप्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.


बालकांच्या लसीकरणासंदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
सद्या लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आल्याने बालकांच्या लसीकरणासाठी काही सुविधा करण्यात आली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लॉकडाउन असले तरी बालकांना विहीत कालावधीमध्येच लसीकरण व्हावे यासाठी मनपा तत्पर आहे. ज्या बालकांना लसीकरण द्यायचे असेल त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षामध्ये ०७१२-२५६७०२१, २५५१८६६, २५६२४७४ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’ दरम्यान ज्या महिलांनी लसीकरणासंदर्भात प्रश्न विचारले त्यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्याच वेळी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली.