मनपा आणि मॅट्रिक वॉरिअर्सचा पुढाकार : आयुक्तांच्या उपस्थितीत शुभारंभ
नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आणि मॅट्रिक्स वॉरिअर्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. युवा वर्गाच्या सहभागाने संपूर्ण शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वातावरण निर्मितीसाठी हा महत्वपूर्ण पुढाकार असून या उपक्रमाचा मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी गुरूवारी (ता.११) शुभारंभ केला.
यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीसमोर तसेच सायंकाळी स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी येथे संस्थेतील युवकांनी फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण केले. याप्रसंगी अतिरीक्त आयुक्त श्री. दिपककुमार मीना, श्री. राम जोशी, मुख्य अभियंता श्री. प्रदीप खवले, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, श्री. विजय हुमने, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, उदयान अधिक्षक अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी पियुश आंबुलकर उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी मॅट्रिक्स वॉरिअर्स संस्थेचे अध्यक्ष आदित्य खोब्रागडे यांच्याकडे तिरंगा हस्तांतरीत करीत उपक्रमाचा शुभारंभ केला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने स्वातंत्र्याविषयी विविध प्रकारची माहिती आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने नागपूरमधील युवक संघटना मॅट्रिक्स वॉरियर्स संस्थेने नागपूर महानगरपालिकेमध्ये फ्लॅश मॉब कार्यक्रम सादर केला. संस्थेचे अध्यक्ष आदित्य खोब्रागडे, सचिव अभिषेक उरकुडे, कोषाध्यक्ष आकाश निखाडे, सहसचिव नंदिनी मेंजोगे, शैलेश भलमे, आदर्श दुधनकर यांच्यासह ४० युवकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागपुरातील विविध भागात, फ्लॅश मॉब जागरूकता मालिका सादर केली जाणार आहे.
मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनच्या युवकांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. गणेश वंदना करून त्यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर देशभक्तीपर गीतांवर उत्साह वाढविणारे नृत्य सादर केले. समुहातील युवकांनी झाशीची राणी, चंद्रशेखऱ आजाद, सुभाषचंद्र बोस यांच्या देशसेवेचे उल्लेख करून, स्वातंत्र्यसैनिबाबत राष्ट्रभक्ती जागवली. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती अडचणी आल्यात याबाबत माहितीपर नाटिका सादर करण्यात आली. पुढील पिढीला आपल्या भारत देशाच्या तिरंग्याचा सन्मान आणि महत्व कळावं यासाठी समुहाच्या तरुणांनी संदेशपर पथनाट्य सादर केले. त्यानंतर वंदे मातरम.. भारत माता की जय.. अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी तरुणांसमोर प्रोत्साहनपर मनोगत सादर केले. त्यांनी सांगितले की, तुम्ही आपल्या कार्यक्रमा मार्फत नागपूर शहरातील विविध भागात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे महत्व पोहचविण्याचे कार्य आरंभिले आहे ते कौतुकास्पद आहे. यासाठी सर्व आवश्यक सहकार्य नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रत्येकाने आपल्या घरी सन्मानपूर्वक तिरंगा लावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
इथे होणार फ्लॅश मॉब
१२ ऑगस्ट २०२२
केशवनगर हायस्कूल नंदनवन
दुपारी १२ वाजता
तिरंगा चौक
सायंकाळी ५ वाजता
१३ ऑगस्ट २०२२
संविधान चौक
सकाळी ११ वाजता
फुटाळा तलावासमोर
सायंकाळी ५ वाजता
१४ ऑगस्ट २०२२
लक्ष्मी नगर चौक
सकाळी ९ वाजता
चिटणीस पार्क
रात्री ८ वाजता
१५ ऑगस्ट २०२२
कस्तुरचंद पार्क
सायंकाळी ४ वाजता