Published On : Tue, Mar 21st, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर ब्रांझची छत्री बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती कार्यक्रमांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
– मुंबईतील कुपरेज गार्डनजवळील पुतळ्याजवळ संविधानाची प्रस्तावना व डॉ.बाबासाहेबांचा जीवनपटही बसविणार

– 14 एप्रिलला येणाऱ्या भाविकांना योग्य सोयीसुविधा देण्याच्या यंत्रणांना सूचना 


मुंबई:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या राज्यभरातील अनुयायांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहातील एका विशेष बैठकीत घेतला. कुपरेज गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर ब्रांझची छत्री बसविण्यासंदर्भात तसेच इतर सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना केल्या.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस. मदान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भन्ते करुणानंद थेरो, चंद्रकांत कसबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मादाम कामा रोडवरील कुपरेज गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर छत्री बसविण्यात येणार आहे. या छत्रीचे उद्घाटन येत्या १४ एप्रिल रोजी करण्यासाठी योग्य ती पूर्वतयारी करावी. जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना परवानगी देण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी नियमानुसार मिरवणुका काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीने पुढाकार घ्यावा. १४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात येईल. तसेच लोकराज्य मासिकाचा विशेष अंक काढण्याची सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिली. चैत्यभूमी येथील स्तुपाचे काम या वर्षी पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी महानगरपालिकेस दिली.

इंदू मिल जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यात सुरू होईल. या स्मारकाच्या आराखडा सर्वसंमतीने तयार केला असून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सर्वांच्या सूचनांचा समावेश करून आराखडा अंतिम करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. इंदुमिल स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या दीड वर्षात होईल व संपूर्ण काम दोन ते सव्वा दोन वर्षात करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काही दिवसात या जागेचे हस्तांतरण पत्र राज्य शासनाला मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कुपरेज गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर बसविण्यात येणारी छत्री ही सात फूट गोल व साडेतीन फूट उंच असणार असून ती संपूर्ण ब्रांझमध्ये बनविण्यात येणार आहे. या परिसरात संविधान व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटाची माहिती असलेले फलक लावण्यात येणार आहेत. तसेच विद्युत दिव्यांची सोयही करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन १२ लाख रुपये देणार असून उर्वरित रक्कम महानगरपालिकेकडून मिळणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Advertisement
Advertisement