Published On : Fri, Jan 12th, 2018

झोनअंतर्गत येणाऱ्या सर्व तक्रारी प्राधान्याने सोडवा : मनोज चापले


नागपूर: महानगरपालिकेच्या झोनअंतर्गत विविध तक्रारी येत असतात. त्या सर्व तक्रारी प्राधान्याने सोडवा, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. गुरूवार (ता.११) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपसभापती प्रमोद कौरती, समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या विशाखा बांते, भावना लोणारे, आशा नेहरू उईके, वंदना चांदेकर, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, हत्तीरोग व हिवताप अधिकारी जयश्री थोटे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, अतिक खान प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मागील आढावा बैठकीत झालेल्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आली. जन्म व मृत्यू विभागाच्या कामकाजाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जन्म-मत्यू प्रमाणपत्र विभागाद्वारे सातत्याने तक्रारी येत आहे. त्यासंदर्भातील आढावा घेण्यात आला. जन्म मृत्यू प्रक्रिया ही आता ऑनलाईनद्वारे होत आहे. ही प्रक्रिया केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे. बाळाचा जन्म झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यावर लगेच सहा तासाच्या आत त्याची नोंद मनपाच्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट केली जाते, अशी माहिती उपायुक्त लाडे यांनी दिली. नवीन प्रक्रिया वर्तमानपत्राद्वारे जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात यावी, असे आदेश सभापती श्री. चापले यांनी दिले.

मनपा दवाखान्याच्या कामकाजाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. हिवताप व हत्तीरोग विभागाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यासंदर्भात ज्या ठिकाणी रोग सदृश्य लाव्ही आढळल्या त्या ठिकाणी नोटीस देण्यात यावी आणि त्यानंतरही आढळून आल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. त्यासंदर्भात माहिती देताना जयश्री थोटे यांनी यासाठी करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईविषयी माहिती दिली. घरी जर लाव्ही आढळली तर ५० रूपये दंड, आणि दर दिवसाला २० रूपये दंड आकारण्यात येतो. व्यावसायिक ठिकाणी ५०० रूपये दंड आणि प्रति दिवशी २०० रूपये दंड आकारण्यात येत असल्याची माहिती दिली.

स्वच्छ भारत अभियानाच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाबाबत बैठकीत माहिती दिली. स्वच्छतेसंदर्भात आवश्यक त्या वस्तूंची अर्थसंकल्पात तरतूद करा, असे निर्देश सभापतींनी दिले. यापुढे कचरा गाडीवर लाऊडस्पीकर लावण्यात यावे, असेही ते म्हणाले. बैठकीला सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.