Published On : Tue, Sep 8th, 2020

मास्क न लावणा-या ६४९ नागरिकांकडून दंड वसूली

Advertisement

पाच दिवसात १७८५ विरुध्द कारवाई

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (८ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या ६४९ नागरिकांविरुध्द कारवाई केली आणि त्यांच्याकडून १ लक्ष २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील पाच दिवसात शोध पथकांनी १७८५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३,५७,०००/- चा दंड वसूल केला आहे.

नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मृतांची संख्यासुध्दा झपाटयाने वाढत चालली आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना महापौर श्री.संदीप जोशी व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी वारंवार केली आहे. तरीपण नागरिकांनी त्या सूचनांचे पालन न केल्यामुळे शोध पथकाचे १८० जवानांनी कारवाई करुन दंड वसूल केला. नागपूर पोलिसांच्या जवानांनीसुध्दा धरमपेठ, नेहरुनगर आणि धंतोली झोन अंतर्गत मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५८, धरमपेठ झोन अंतर्गत २०४, हनुमाननगर झोन अंतर्गत ३५, धंतोली झोन अंतर्गत ५८, नेहरुनगर झोन अंतर्गत ३४, गांधीबाग झोन अंतर्गत ४०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २४, लकडगंज झोन अंतर्गत १३, आशीनगर झोन अंतर्गत ४३, मंगळवारी झोन अंतर्गत १३५ आणि मनपा मुख्यालयात ५ जणांविरुध्द मंगळवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.