Published On : Thu, Jun 24th, 2021

शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवा : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

झोनसाठी निर्धारित निधीचा सुद्धा वापर करा : नगरसेवकांच्या समन्वयाने होणार कार्य


नागपूर: नागपूर शहरातील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत मार्गावर असलेल्या सर्व खड्ड्यांबाबत प्राप्त तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देउन शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांच्या माहितीचा रोडच्या नावानुसार अहवाल येत्या सात दिवसाच्या आत सादर करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत.

नागपूर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व त्यामुळे पावसात संभावणारा अपघाताचा धोका लक्षात घेता यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (ता.२३) विशेष बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ही बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, अग्निशमन व विद्युत समिती सभापती दीपक चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी सत्तापक्ष नेता संदीप जाधव, नगरसेवक विजय झलके, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, उपअभियंता कमलेश चव्हाण, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, अशोक पाटील, विजय हुमने, हरीश राउत, सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, सुषमा मांडगे, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अविनाश भुतकर, धनंजय मेंढुलकर, विजय गुरूबक्षाणी आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व झोनमधील खड्ड्यांची माहिती आणि त्यासंदर्भात प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. शहरात ज्या रस्त्यावर खड्डे आढळतात ते बुजविण्याचे काम हॉटमिक्स विभागांतर्गत केले जातात. यासाठी एजन्सी सुद्धा नियुक्त करण्यात आलेली आहे. हॉटमिक्स विभागाव्यतिरिक्त मनपाच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये झोनला खड्डे बुजविण्यासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आलेला आहे. या निधीचा योग्य वापर होउन खड्डे बुजविण्याच्या कार्याला गती प्राप्त व्हावी यासाठी सहायक आयुक्तांनी नियोजन करण्याची गरज असल्याचे महापौर यावेळी म्हणाले. सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या झोनमधील सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून त्यांच्याकडून खड्ड्यांबाबत तक्रारी मागवून घ्याव्यात. त्या तक्रारींवर झोन स्तरावर तोडगा निघत असल्यास झोन निधीचा वापर करून ते खड्डे बुजविण्यात यावे. यामुळे हॉटमिक्स विभागाच्या कार्यवाहीची वाट पहावी लागणार नाही व नागरिकांना दिलासा सुद्धा मिळेल, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. महापौरांनी सांगितले की, हॉट मिक्स प्लांट कडून विविध विभागाच्या अंतर्गत येणा-या रस्त्यांवरीलही सर्व खड्डे बुजविण्याची कार्यवाही अपेक्षित आहे. यासाठी कोणतीही हयगय स्वीकारली जाणार नाही. माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी ज्या शासकीय विभागाकडून खड्डे बुजविले गेले नाही त्यांना माहिती देण्याची सूचना केली.

अर्धवट काम करणा-या ठेकेदारांना दणका
अनेक ठिकाणी सिमेंट रोडचे काम झालेले आहे. मात्र दोन रस्त्यांच्या मधील ‘इंटरलॉकींग’ करण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होत आहे. अशा स्वरूपाचे अर्धवट कामे करून बिल सादर करणा-या कंत्राटरांबाबत कठोर पवित्रा घेत त्यांना ‘काळ्या यादीत का टाकू नये’ असे नोटीस देण्यात यावे, असा दणका ही महापौरांनी दिला. संबंधित एजन्सीकडून ज्या ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्षात तेथील काम झाले अथवा नाही याची प्रत्यक्षस्थळी जाउन पाहणी करण्यात यावी. यामध्ये खड्डे बुजविलेले न आढळल्यास संबंधित एजन्सीवरही कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी बैठकीत दिले. धंतोली झोन मधील कॉटन मार्केट ते मोक्षधाम पर्यंतचा रस्ता खराब आहे. यासाठी झोनकडून सिमेंट रोड प्रस्तावित केले होते पण ते मंजूर झाले नाही. या कार्याला पुन्हा सुरु करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

लसीकरण केंद्रांच्या मार्गावरील खड्डे प्राधान्याने बुजवा
शहरात १८ वर्षावरील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. यासाठी लसीकरण केंद्रांकडे जाणा-या मार्गांवर जाणा-या वाहनांची संख्या सुद्धा वाढली आहे. यामार्गांवर असलेल्या खड्ड्यांमुळे कुठलाही धोका निर्माण होउ नये याकरिता प्राधान्याने लसीकरण केंद्रांच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहे. याशिवाय जी स्थळे अपघातग्रस्त आहेत वा स्थळांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका संभावतो अशा स्थळांची माहिती घेउन ते खड्डे सुद्धा बुजविण्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी यावेळी केली.