Published On : Sat, Mar 24th, 2018

खनिज निधीतील कामांचे व्हिडिओ चित्रीकरण करा

Advertisement

नागपूर: जिल्ह्याला खनिज प्रतिष्ठानकडून मिळणार्‍या निधीतून होणार्‍या प्रत्येक कामाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. तसेच या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अंकेक्षण करण्यासाठी एक त्रयस्थ यंत्रणेची नियुक्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

खनिज निधीचे नियोजन केल्यानंतर कामाचा आढावा घेण्यासाठ़ी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकरराव देशमुख, आ. समीर मेघे, आ. सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सीईओ कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते. जिल्ह्याला खनिज निधीतून 116 कोटी उपलब्ध होत आहे. यापैकी 86 कोटींचे नियोजन झाले आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, महिला बाल कल्याण, शिक्षण, आदिवासी कल्याण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांना 10 टक्के निधीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा मजबूत करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभागाकडून जि.प.च्या सर्व शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. याशिवाय खाण बाधित क्षेत्रात अधिक निधी वाटप करून त्या भागाचा विकास करण्यात येणार आहे.

खनिकर्मच्या निधीसाठी केंद्र शासनाने एका परिपत्रकातून या निधीतून कोणत्या योजना घेता येतात व निधी वितरण कसे करायचे या संबंधीचे मार्गदर्शन केले आहे. त्या परिपत्रकानुसारच नियमात बसून सर्व कामेे करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. आतापर्यंत जिल्हाधिकारी खनिकर्म विभागाला 506 विविध विभागांच्या कामाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेमार्फत जी कामे होणार आहेत, सर्व कामांचे यूसी प्रमाणपत्र सीईओंच्या स्वाक्षरीचे लागणार आहे, त्याशिवाय निधी मिळणार नसल्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

गोंडवाना संग्रहालय गोरेवाड्यात
आदिवासींचे गोंडवाना संग्रहालय (म्युझियम) गोरेवाड्यात करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. गोंडवाना संग्रहालयासाठी शासनाने 24 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. पण 4 वर्षापासून जागा उपलब्ध झाली नाही. गोरेवाड्यात जागा उपलब्ध होणार असल्यामुळे आता गोरेवाडा येथे हे संग्रहालय करण्यात येणार आहे.