Published On : Wed, Mar 31st, 2021

अवैधपणे वीज पुरवठा जोडणाऱ्या “आप” कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर: थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित केल्यावर तो अवैधपणे जोडणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गड्डीगोदाम परिसरात राहणारे वीज ग्राहक मोहम्मद इब्राहीम मोहम्मद याकूब या वीज ग्राहकाकडे १ लाख २९ हजार ९७० रुपयांची थकबाकी होती. महावितरणकडून वारंवार पाठपुरावा करूनही मोहम्मद इब्राहीम मोहम्मद याकूब दाद देत नसल्याने महावितरणचे सहायक अभियंता रेवत येसांबरे यांनी आपले शाखा कार्यालयातील सहकारी निखिल घायवट, मोरेश्वर पटले, प्रकाश बडोले यांना सोबत घेऊन थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीज पुरवठा २५ मार्च रोजी खंडित केला. वीज पुरवठा खंडित केल्यावर महावितरणकडून वीज ग्राहकाचे वीज मीटर आणि सर्व्हिस वायर पण जप्त करण्यात आली.

या नंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत वाघ, कविता सिंघल, प्रभात अग्रवाल ,अलका पोपटकर यांनी थकबाकीदार वीज ग्राहकाचा वीज पुरवठा अवैधपणे जोडला. तसेच उपस्थित जनतेसमोर महावितरण विरोधात चिथावणीखोर भाषण केले. या घटनेची माहिती सहायक अभियंता रेवत येसांबरे याना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, थकबाकीदार वीज ग्राहकाने थेट वीज पुरवठा जोडल्याचे आढळून आले. महावितरणकडून पुन्हा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थितानी यात आडकाठी आणली. तसेच वीज पुरवठा दबाव आणून सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी महावितरणकडून सदर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्या आधारे पोलिसांनी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत वाघ, कविता सिंघल, प्रभात अग्रवाल ,अलका पोपटकर यांच्या विरोधात भारतीय विदुयत कायदा कलम १३५, १३८. भादंवि कलाम १८६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सदर पोलीस करीत आहे.

सक्करदरा आणि नंदनवन ठाण्यातही गुन्हा दाखल
महावितरणकडून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यावर तो पुन्हा अवैधपणे जोडून दिल्या प्रकरणी महावितरणकडून सक्करदरा आणि नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जवाहर नगर येथील वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्यावर तो पुन्हा जोडून दिल्या प्रकरणी सहायक अभियंता श्रीराम मुत्तेमवार यांनी दिलेल्या तक्रारी नंतर सक्करदरा पोलिसांनी वीज ग्राहक राजेश तिवारीसह पियुष आकरे, मनोज डफरे,संजय जीवतोड,अमोल मुळे, संजय अनासने, शुभम पारले, विकास नागराळे, अमोल गिरडे यांच्या विरोधात विदुयत कायदा कलम १३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संत गाडगे बाबा नगरातील सत्यफुलाबाई उराडे यांच्याकडे वीज देयकाची थकबाकी होती. महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यावर त्यांचा मुलगा राकेश उराडे याने आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून वीज पुरवठा अवैधपणे जोडून घेतला.