Published On : Tue, Sep 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

सावनेरच्या शेतकऱ्याची अंजीर लागवडीत यशोगाथा; दोन एकरांतून ७ ते ८ लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा

Advertisement

सावनेरच्या शेतकऱ्याची अंजीर लागवडीत यशोगाथा; दोन एकरांतून ७ ते ८ लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षानागपूर : विदर्भातील हवामानात अंजीर लागवड यशस्वी होऊ शकते, हे सावनेर तालुक्यातील शेतकऱ्याने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. मौजा कवडस येथील शेतकरी सुनील ठाकरे यांनी दोन एकर क्षेत्रावर अंजीर पिकाची लागवड करून नवी दिशा निर्माण केली आहे. अवघ्या एका वर्षाच्या अंजीर बागेतून त्यांना ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

ठाकरे यांनी सुमारे वर्षभरापूर्वी दोन एकर क्षेत्रावर डायना या वाणाची अंजीर लागवड केली. यासाठी त्यांनी ठिबक सिंचन, बेड पद्धती आणि प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला. अंजीराची लागवड १० बाय ८ फूट अंतरावर करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अंजीर विकास छाटणी, गांडूळ खताचा वापर, बुरशीनाशकांच्या फवारण्या तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर विशेष भर दिला. योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे बागेची चांगली वाढ झाली असून, पहिल्याच वर्षात समाधानकारक उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली आहे.

शेतातच फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची तयारी

अंजीर उत्पादनाबरोबरच ठाकरे यांनी मूल्यवर्धनावरही भर दिला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग योजना २०२६-२७ अंतर्गत त्यांच्या शेतावरच फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया त्यांनी हाती घेतली आहे.

स्वतःच्या शेतात उत्पादित होणाऱ्या अंजिरावर प्रक्रिया करून त्याचे पॅकिंग करण्यात येणार असून, हे उत्पादन नागपूर शहरातील मॉल, हॉटेल्स आणि घाऊक विक्रेत्यांना थेट विक्री करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे केवळ उत्पादन न करता प्रक्रिया व थेट बाजारपेठेच्या माध्यमातून अधिक मूल्य मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवा संदेश

अंजीर हे प्रामुख्याने विशिष्ट हवामानाच्या भागातील पीक मानले जात असले तरी योग्य तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाल्यास विदर्भातही त्याची यशस्वी लागवड करता येऊ शकते, असा संदेश ठाकरे यांच्या प्रयोगातून मिळत आहे.

सुनील ठाकरे हे निशिगंधा शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेती करीत आहेत. त्यांच्या अंजीर बागेला परिसरातील शेतकऱ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कृषी विभागाकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन

ठाकरे यांच्या शेताला कृषी विभागाची टीम वेळोवेळी भेट देऊन अंजीर बागेची प्रत्यक्ष पाहणी आणि मार्गदर्शन करीत आहे. तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठी, मंडळ कृषी अधिकारी खापा विलास भिसे, उप कृषी अधिकारी खापा-१ रोशन डंबारे, सहाय्यक कृषी अधिकारी पिपळा मीनल वैद्य आणि कृषी अधिकारी पाटणसावंगी अनिल खरपुरे हे शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत.

अवघ्या एका वर्षाच्या अंजीर बागेतून दोन एकर क्षेत्रात ७ ते ८ लाख रुपयांच्या उत्पादनाची अपेक्षा असल्याने सुनील ठाकरे यांचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी थेट जोडणी केल्यास अंजीर लागवड विदर्भातील शेतकऱ्यांसाठीही उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हे या यशोगाथेतून अधोरेखित झाले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.