Published On : Sat, Jun 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये भीषण अपघात; मनपाच्या कचरा ट्रकने घेतला तरुणाचा जीव

महिला व बालकाची आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंजत
Advertisement

नागपूर : शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. कचरा संकलन करणाऱ्या मनपाच्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि १२ वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

मृत तरुणाचे नाव नितीन पंचेश्वर (२० वर्षे) असे असून, जखमी महिलेची ओळख सारा गाडेकर (४० वर्षे) आणि मुलाचा आदर्श पाचे (१२ वर्षे) असा आहे. तिघंही एका दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली.

कसा झाला अपघात?
सकाळच्या सुमारास मनपाचा कचरा संकलन करणारा ट्रक डंपिंग यार्डमधील धर्म कांटा परिसरात वळत असताना, मागून वेगात आलेली दुचाकी ट्रकच्या मागच्या चाकांवर आदळली. टक्कर इतकी जबरदस्त होती की, नितीनचा जागीच मृत्यू झाला. सारा आणि आदर्श गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर चिखल साचलेला होता आणि ट्रक चालकाने कोणतीही सूचना न देता अचानक वळण घेतल्याने हा अपघात झाला.

पोलिसांचा तपास सुरू-
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह उत्तरीय तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, जखमींवर भवानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

Advertisement

या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, खराब रस्ते आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.