नाशिक :महाराष्ट्रातील नाशिक येथे भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली आहे. यावेळी संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. नाशिकमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो. मध्यंतरी कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला गेला.मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सरकार देशातील मूळ प्रश्नांना बगल देऊन इतर ठिकाणी लक्ष वळविण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालत त्यांना जीएसटीमधून बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आम्ही ७० कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यातून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र पंतप्रधान मोदी यांनी केवळ काही धनाढ्य लोकांसाठी १६ लाख कोटींची कर्जमाफी केली. देशातील ७० कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती या २० ते २५ धनाढ्य लोकांकडे आहे, अशा कठोर शब्दात राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला.
सरकारला उद्योगपतींची कर्जमाफी करायची असेल तर शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करावी लागेल, तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कायद्याने अमलात आणाव्या लागतील, पिकविमा योजनेची पुर्नरचना केली जाईल, चौथे म्हणजे शेतकरी जेव्हा कांदा विकण्यासाठी आणतो तेव्हा आयात-निर्यात धोरण बदलून त्याचे उत्पन्न घटविले जाते. आमचे सरकार आल्यानंतर आयात-निर्यात धोरणापासून शेतकऱ्यांचे संरक्षण केले जाईल. शेवटचा आणि पाचवा उपाय म्हणजे जीएसटीमुळे शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे कर लागत आहेत. त्यामुळे जीएसटीचा अभ्यास करून शेतकरी जीएसटीच्या बाहेर राहिल, याचा प्रयत्न आम्ही करू, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले. तसेच अग्नीवर योजनेवरुनही राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.