Published On : Mon, Nov 12th, 2018

कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनामुळे शेतकऱ्यांचे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड!: विखे पाटील

Advertisement

Radhakrishna Vikhe Patil

लोणी : कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अखेरपर्यंत लढणारे एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त मनाला अत्यंत वेदना देणारे आहे. ते गेले अनेक दिवस आजारी होते. मात्र आजारपणातही त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीचा पाठपुरावा थांबवला नाही. त्यांच्या निधनामुळे विखे पाटील परिवाराशी तीन पिढ्यांचे नाते जोपासणारे एक ज्येष्ठ मार्गदर्शक गेल्याचे दुःख मोठे असल्याचे विखे पाटील म्हणाले.

खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या होत्या. मात्र खंडकरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी एकत्रितपणे सुरू केलेली चळवळ ऐतिहासिक ठरली. राज्याच्या विधानसभेत २००१ मध्ये याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यानंतर २००२ साली तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन् यांनी त्यावर स्वाक्षरी केली. खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशालाही मार्गदर्शक ठरली.

या लढ्यातील नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने केलेला पाठपुरावा खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा ठरला. या संपूर्ण लढाईत माधवराव गायकवाड यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आणि अविस्मरणीय असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

कॉम्रेड गायकवाड यांनी आयुष्यभर विचारधारेशी एकरूप राहून राजकीय व सामाजिक वाटचाल केली. शेती, शेतकरी आणि पाणी प्रश्नावर नेहमी ठाम भूमिका मांडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी तेव्हाच्या नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचे प्रश्न हिरीरीने मांडल्याचे सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.