Published On : Mon, Mar 12th, 2018

शेतक-यांचे प्रश्न न सोडवणा-यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाहीः खा. अशोक चव्हाण

Advertisement


मुंबई: भाजप सरकारच्या काळात राज्यात तेरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इतिहासात कधी नव्हे तो शेतक-यांनी संप पुकारला. आता आपल्या मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतक-यांनी किसान लाँग मार्च काढला आहे. राज्यातले सरकार शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून शेतक-यांचे प्रश्न न सोडवणा-या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिला नाही अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज आझाद मैदानात जाऊन किसान लाँग मार्च मध्ये सहभागी होऊन शेतक-यांशी संवाद साधला यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत आहे. बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसानभरपाई दिली नाही, गारपीटग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. राज्यातले सरकार शेतक-यांना आश्वासनाशिवाय काही देत नाही. नुकसानीचे पंचनामे करताना शेतक-यांच्या गळ्यात पाट्या लटकवणारे सरकार निरव मोदी आणि विजय माल्ल्या यांच्या गळ्यात पाट्या घालून फोटो केव्हा काढणार आहे? सवाल खा. चव्हाण यांनी केला. या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शेतकरी, गरीब, दलित, आदिवासींचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष भाजपला सत्तेवरून पायऊतार करेपर्यंत सुरुच ठेवावा लागेल. या संघर्षात काँग्रेस पक्ष कायम शेतक-यांसोबत राहिल. भाजपच्या एका खासदाराने किसान लाँग मार्च मध्ये सहभागी शेतक-यांना शहरी माओवादी म्हटले आहे. जगाचा पोशिंदा असणा-या बळीराजाला माओवादी म्हणताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली ते म्हणाले गरिब आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम मोदी सरकार करित असून भाजपचे सरकार गेल्याशिवाय शेतक-यांची दुरावस्था थांबणार नाही.