Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Nov 11th, 2017

  शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे – नितीन गडकरी


  नागपूर
  : शेतीच्या प्रश्नांवर योग्य सल्ला आणि शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी ॲग्रोव्हिजन कार्यशाळेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन येथील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपला शेतीत करावा. येथील आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय अधिक यशस्वीरित्या करता येईल.

  कृषी व्यवसायात उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेवून उत्पादन दुप्पट करावे तसेच जैविक शेतीकडे वळावे. असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा शुद्धिकरण मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  ॲग्रोव्हिजन या 9व्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन रेशीमबाग मैदानावर करण्यात आले आहे. ॲग्रोव्हिजन कार्यशाळेतील परिसंवादाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट महाराष्ट्र किसान आघाडीचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, भदोई(उ.प्र.) लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. विरेंद्र सिंग, श्रीमती सुनिता गावंडे, तसेच ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, रमेश मानकर उपस्थित होते.

  नितीन गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांनी शेती करताना शेतीपूरक व्यवसायावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात हेटीकुंडी या गावात गौळावू गायीपासून मिळणारे गोमूत्र मधूमेहावर अत्यंत गुणकारी सिद्ध झाले आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक शेतीकडे वळावे. जैविक शेतीमुळे जमिनिचा कस देखील कायम राहतो. शेतकऱ्यांनी कॅनलद्वारे पाणी उपसासिंचन करण्यापेक्षा पाईपद्वारे ड्रिप किंवा स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिकांना पाणी द्यावे. ड्रिपच्या सहाय्याने पाणी दिल्यामुळे जमीनीत पाणी खोलवर मुरुन ओलावा कायम राहतो.

  यासाठी‘वन ड्रॉप मोअर क्रॉप’ हे धोरण अंगिकारावे. यामुळे पिकांचे उत्पादन 2.5 टक्क्याने वाढेल. खतांच्या निर्मितीसाठी मानवी केस, मूत्र यांचा योग्यरितीने वापर केल्यास अल्पदरामध्ये खत निर्मिती होऊ शकते. यासाठी उद्योजकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन यांनी सांगितले.


  अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट म्हणाले, शेतकऱ्यांचे निसर्गावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागात संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. संशोधनाच्या माध्यमातून कोणत्या वेळेला कोणत्या पिकाची रोवणी करावी, कोणते बीज वापरावे तसेच पूरक व्यवसाय व त्याचे फायदे याविषयी योग्य माहिती ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना येथेच अनुभवी शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. बदलत्या हवामानानुसार शेतीत करावयाच्या बदलांची माहिती तसेच यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा अनुभवयाला मिळत आहे. मधमाशी पालन, हळद व आले उत्पादन प्रकिया तंत्रज्ञान, फूलशेती, डाळींब लागवड, मत्स्यपालन, शेळीपालन या समवेत कीटकनाशकांच्या जबाबदार वापराविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. सद्य:स्थितीत राज्यात रेशीम उद्योगामध्ये चांगली संधी निर्माण होत आहे. या विषयी शेतकऱ्यांना येथे मार्गदर्शन मिळत आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करुन कृषी उत्पादकता कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  कृषी प्रदर्शनाचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी ॲग्रोव्हिजन कार्यशाळेबद्दल बोलतांना म्हणाले की, ॲग्रोव्हिजन ही केवळ प्रदर्शन नसून येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तीसपेक्षा जास्त कार्यशाळा घेण्यात येत आहेत. येथे शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला मोफत दिल्या जातो. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांव्यतिरिक्त इतर पिकेही घ्यावीत. यासाठी आळींबी उत्पादन, जवस उत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती उत्पादन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतमाल मार्केटिंगबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. येथे स्वतंत्र पशुधन दालनामध्ये कुक्कुटपालन उद्योग तसेच गायी-म्हशी, बकऱ्या यांच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या प्रजातींची प्रत्यक्ष माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कमी वेळात अधिक उत्पादन व नफा देणारे पीक म्हणजे बांबू आहे. बांबूपासून लोणची ते कपड्यांपर्यंत तर गृह सजावटीपासून इमारतीच्या उभारणीपर्यंत उपयोगात येते. बांबू उद्योगातील संधीबाबतही तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. यासाठी शेतकरी बांधव तसेच कृषी क्षेत्रातील उद्योजकांनी, संबंधितांनी ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाला देवून या मार्गदर्शनाचा उपयोग करण्याबाबत यावेळी त्यांनी सांगितले.
  कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145