Published On : Fri, Mar 24th, 2017

मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्यावर पोलिसांची दडपशाही!


मुंबई:
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याला मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्याच्यावर प्रचंड दडपशाही केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील रामेश्वर हरीभाऊ भुसारी नामक तरूण शेतकऱ्यासोबत ही गंभीर बाब घडली. या शेतकऱ्याला गुरूवारी मारहाण झाली. परंतु, त्याला न्याय देण्याऐवजी पोलिसांनी त्याच्याविरूद्धच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भात माहिती मिळताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी आदी नेते व अनेक आमदारांनी तातडीने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे गाठले.

सदरहू शेतकरी कुठे आहे, विचारणा केली असता त्याला न्यायालयात नेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, त्या शेतकऱ्याला दूरध्वनी केला असता त्याने आपल्याला पोलीस ठाण्यातील एका खोलीत ठेवल्याचे सांगितले. पोलीस अधिकारी दिशाभूल कऱणारी माहिती देत असल्याचे लक्षात येताच सर्वच नेते संतप्त झाले. दरम्यान, काही नेत्यांनी त्या शेतकऱ्याला स्वतः शोधून पोलीस निरीक्षकासमोर उभे केले. त्यानंतर अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे या तीनही नेत्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

मी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नसून, उलटपक्षी मंत्रालयात मारहाण झाल्यानंतर पोलिसांच्या वाहनातून पोलीस ठाण्यात आणले जात असताना गळ्यातील गमचा दोन्ही बाजुंनी ओढून माझाच गळा आवळण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती शेतकरी रामेश्वर भुसारी यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिली. त्यामुळे सर्व नेते कमालीचे संतप्त झाले. मदतीची अपेक्षा घेऊन मुंबईला येणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? अशी विचारणा अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांच्या दबावामुळे रामेश्वर भुसारी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भात पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे.