Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 2nd, 2018

  वैचारिक कट्टरवादाबाबत बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांना बळ!

  Vikhe Patil
  मुंबई: राज्य सरकारने सातत्याने वैचारिक कट्टरवादाबाबत उदासिन व मवाळ भूमिका घेतल्यामुळे सनातन आणि संभाजी भिडे सारख्या समाजविघातक घटकांना बळ मिळते आहे. अप्रिय घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करण्यापेक्षा अशा घटना घडूच नये, याकरिता सरकारने वैचारिक दहशतवाद माजवणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यायला हवा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

  भीमा कोरेगाव प्रकरणाचे आज राज्यभरात अनेक ठिकाणी उमटलेल्या पडसादाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते, यावेळी विखे पाटील यांनी नागरिकांना शांतता व संयम पाळण्याचे आवाहन केले. विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचे समाजविघातक घटकांचे कारस्थान आहे, या कारस्थानाला सर्वांनी मिळून चोख प्रत्युत्तर देण्याची गरजही त्यांनी विषद केली.

  भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेवर गुन्हे दाखल झाल्यासंदर्भात ते म्हणाले की, ही कारवाई पुरेशी नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला नख लावू पाहणाऱ्या घटकांना ठेचून काढणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने वैचारिक दहशतवाद माजवणाऱ्या सर्वच संघटनांविरुद्ध कठोर भूमिका घेतली पाहिजे. परंतु सनातनसारख्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी वारंवार होत असतानाही सरकार त्याची दखल घेत नाही. संभाजी भिडे व त्याची संघटना समाजात तेढ निर्माण करीत असल्याचे निदर्शनास येत असतानाही त्यांच्याबाबत बोटचेपी भूमिका घेतली जाते. त्यामुळेच राज्यात भीमा कोरेगाव सारख्या घटना घडतात, असेही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145