Published On : Sat, Aug 28th, 2021
maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

फेसबुकची कर्ज सुविधा सायबर गुन्हेगाराच्या पथ्यावर: अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

फेक संकेतस्थळाचा धोका, फसवणुकीची शक्यता.

नागपूर: फेसबुकने लहान व मध्यम उद्योजकांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाने सैरभैर झालेल्या व्यापाऱ्यांच्या मनस्थितीचा फायदा घेऊन सोशल मिडियावरील सायबर गुन्हेगार नवा सावज हेरण्यासाठी तयार होण्याची शक्यता बळावली आहे. फेसबुकसारख्याच वेबसाईट तयार करून फसवे, फेक मेसेज पाठवून जाळ्यात ओढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

देशात फेसबुक वापरकर्त्यांची मोठी संख्या आहे. फेसबुकने आता लहान व मध्यम उद्योजकांना ५ ते ५० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. याबाबत नुकताच घोषणा करण्यात आली. या घोषणेने सोशल मिडियाच्या माध्यमातून आर्थिक गुन्हे करणाऱ्यांनी ग्राहक शोधणे सुरू केल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. फेसबुकने इंडिफाय या कंपनीसोबत करार केला असून लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देऊन त्यांना नवी उभारी देण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले.

विशेष म्हणजे फेसबुकची ही कर्ज सेवा ऑनलाईन अर्ज करूनच मिळणार आहे. त्यामुळे आता फेसबुकसारखेच संकेतस्थळ, अनधिकृत मोबाईल अप्लिकेशन तयार होण्याची शक्यता आहे. फेसबुक प्रत्येकाच्याच ओळखीचे व विश्वासाचे असल्याने त्याचा गैरवापर करीत बॅंकेचे ओटीपीही हस्तगत करून सायबर गुन्हेगार कुणाचीही फसवणूक करू शकतात, अशी भीतीही पारसे यांंनी व्यक्त केली.

विविध अनधिकृत मोबाईल अप्लिकेशन्सचा वापर करून फसवे कॉल करून व्यापाऱ्यांची लूट करण्याचीही शक्यता आहे. सायबर गुन्हेगार बनावटी एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट्स बनवून संबंधित व्यापारी, उद्योजकांची कागदपत्रे, बँक खात्यासह हस्तगत करू शकतात. कोरोनामुळे प्रत्येकच उद्योग मंदावला असून उद्योजकांंना आर्थिक मदतीची गरज आहे. नेमकी हीच बाब हेरून सायबर गुन्हेगार अशा लोकांना लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुकपेक्षा कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष फेसबुकसारख्याच संकेतस्थळ, ॲप्लिकेशन्स तयार करून सायबर गुन्हेगार पाठवू शकतात. परिणामी मोठ्या फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुकने महिलांसाठी कर्जाबाबत विशेष सुविधा दिली आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांसाठी महिला सॉफ्ट टारगेट असून त्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

फेसबुक कर्जाच्या नावावर आर्थिक व्यवहार करताना संबंधित व्यक्ती अधिकृत प्रतिनिधी आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांनी सोशल मीडियाचा वापर आर्थिकदृष्ट्या गरज असलेल्यांची रेकी करण्यासाठी सुरू केला आहे. त्यामुळे उद्योजक किंवा व्यापाऱ्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अनोळखी यूजर्ससोबत पोस्ट करू नका. बेसावध, बेजाबदार पोस्टमुळे नागरिक सायबर गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट ठरू शकते.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.

www.ajeetparse.com