Published On : Mon, Feb 17th, 2020

प्रयोगशाळेतील संशोधन प्रत्यक्ष शेतात पोहोचले तरच शेतकऱ्यांचा विकास होईल – राज्यपाल

Advertisement

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा 38 वा पदवीदान सोहळा उत्साहात

रत्नागिरी : विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्याने प्रयोगशाळेत शोध लावले जात आहेत, संशोधन होत आहे, याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी होण्याकरिता संशोधन शेतापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी हे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान सोहळ्यात बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ.संजय सावंत, शिक्षण संचालक डॉ.सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.संजय भावे, संशोधन संचालक डॉ.पराग हळदणकर, कुलसचिव डॉ.प्रमोद सावंत, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. खांदेतोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या सर्वसाधारण विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा 50 टक्के होता तो आता घटून 14 टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली त्यावेळी राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा असणारा 28 टक्के वाटा घटून आता तो 12 टक्क्यांवर आला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशात 50 टक्के वर्ग शेत मजुरी व नोकरीच्या क्षेत्रात असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संशोधनाची मदतच होणार आहे. यात विद्यापीठाने आपला वाटा उचलावा, असेही राज्यपाल म्हणाले. रत्नागिरीमधील भूमी मला माझ्या उत्तरांचलची आठवण देणारी भूमी आहे. येथील विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोत्तम रत्न म्हणून नाव उज्ज्वल करण्याची कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. मराठी राज्यातील कृषी विद्यापीठ असल्याने यापुढील काळात विद्यापीठाने पदवीदान समारंभ मराठी भाषेत घ्यावा, अशी सूचना राज्यपालांनी केली.

कार्यक्रमाची सुरुवात दीक्षांत संचलन आणि पसायदानासह राष्ट्रगीताने झाली.

आजच्या या पदवीदान समारंभात 63 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट तसेच 317 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि 3144 पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली.

कुलगुरू डॉ. सावंत यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रगतीचा आलेख याप्रसंगी मांडला. मत्स्य शिक्षण महाविद्यालयाच्या काही पदव्यांचा प्रश्न निर्माण झाला याबाबत दुरुस्ती केल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत तसेच विद्यापीठाचा दर्जा सुधारणेबाबत नवे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले. आता विद्यापीठाने इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्चमधील साठ विद्यापीठांमध्ये आपला दर्जा उन्नत बत्तीसाव्या संघातील आहे. मागील वर्षी विद्यापीठ 59 व्या क्रमांकावर होते. राज्यात विद्यापीठाचा राहुरी कृषी विद्यापीठानंतर दुसरा क्रमांक लागतो, असेही त्यांनी सांगितले.

या विद्यापीठात पृथ्वी व्यतिरिक्त कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मत्स्यव्यवसाय हॉर्टिकल्चर आणि फॉरेस्ट्रीचे शिक्षण दिले जाते. विद्यापीठाशी संलग्न सात महाविद्यालय असून त्यांची एकूण क्षमता 395 विद्यार्थ्यांची आहे. 194 पदव्युत्तर पदवी, 47 पीएचडी विद्यार्थ्यांची क्षमता विद्यापीठात आहे. याव्यतिरिक्त 23 खाजगी महाविद्यालय संघटना असून त्याअंतर्गत 1510 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यापीठाने बायोटेक्नॉलॉजी सीड ब्रीडिंग जीन एडिटिंग आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर आता सुरू केला आहे. याखेरीज खास कोकणची ओळख असणाऱ्या हापूस आणि वेंगुर्ला काजूची जिओ-टॅगिंग देखील प्राप्त करून घेतले आहे, याचा फायदा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना होणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

तत्पूर्वी राज्यपाल महोदयांचे विद्यापीठातील होस्टेल पटांगणातील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे तसेच विद्यापीठाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.