नागपूर – नागपुरातील शांतिनगर ते कवडपेठ दरम्यान सुमारे १८० कोटी रुपयांच्या खर्चाने बांधलेला पूल नागरिकांसाठी दिलासा ठरण्याऐवजी त्रासदायक ठरत आहे. पूल उघडल्यानंतर त्यातील तांत्रिक त्रुटी समोर येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार खोपडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून या प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सेंट्रल रोड फंडच्या माध्यमातून व्यस्त भागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, पूल सुरु झाल्यानंतर तांत्रिक चुका उघड झाल्या असून यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
खोपडे म्हणाले की, या प्रकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घोर दुर्लक्ष करण्यात आले आहे. कामात झालेली अनियमितता ही नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित आहे.
पुलावरील टी-पॉईंट हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून वेळेवर दुरुस्त्या न झाल्यास मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागेल, असेही आमदार खोपडे यांनी सांगितले. त्यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १८० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याची गरज आहे.