Published On : Tue, Aug 29th, 2017

‘ऑनलाईन’ च्या घोळामुळे नागपूर विद्यापीठात पदवीधर नोंदणीला मुदतवाढ !

Advertisement

Nagpur University
नागपूर:
पदवीधर नोंदणीत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सदर नोंदणीसाठी ५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये ‘ऑनलाईन प्रणाली’मुळे सावळा गोंधळ सुरु आहे. त्यात आणखी ह्या प्रकरणाची भर पडल्याने अखेरच्या दिवशी पदवीधर नोंदणीकरिता प्रशासनातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठांतर्गत पदवीधर नोंदणीचा कार्यक्रम १२ जुलै २०१७ पासून सुरू करण्यात आला. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ११ आॅगस्ट २०१७ हा नोंदणीचा अखेरचा दिनांक होता. मात्र विविध कारणांमुळे नोंदणी रखडल्यामुळे २८ आॅगस्टपर्यंत प्रशासनाने मुदतवाढ दिली होती. ‘आॅनलाईन’ शुल्क तसेच अर्ज ‘डाऊनलोड’ करण्याची ‘लिंक’ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनदेखील विद्यापीठाने दिले होते.

अनेकांना भरलेल्या अर्जाची ‘प्रिंटआऊट’ काढायला अडचणी येत आहेत. काही पदवीधरांनी मोबाईलवरून अर्ज भरला. प्रत्येक वेळी लगेच ‘प्रिंटआऊट’ काढणे शक्य नसते. अर्ज ‘सेव्ह’ करून नंतर प्रिंटआऊट काढण्यासाठी ‘लिंक’च उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले. ‘ई’ शुल्कासंदर्भात निवडणुकांचे ‘आॅनलाईन’ काम सांभाळणा-या कंपनीने सादरीकरणदेखील दिले होते व सुरुवातीचे काही दिवस ‘आॅनलाईन’ शुल्क सहज भरता आले.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्यासाठी वेगळी ‘लिंक’देखील दिली. ‘डेबिट कार्ड’ किंवा थेट ‘नेटबॅकिंग’द्वारे पैसे भरण्याची सोय होती. मात्र मागील आठवड्यापासून सर्व माहिती भरल्यानंतर पैसे भरण्यासाठी ‘क्लिक’ केल्यावर ‘पेमेन्ट प्रोसेसिंग फेल’ असाच संदेश येत आहे.

दुपारच्या सुमारास सर्वपक्षीय संघटनांनी कुलगुरूंकडे मुदतवाढीसंदर्भात निवेदनदेखील सादर केले. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य महेंद्र निंबार्ते, माजी विधीसभा सदस्य रितेश गाणार, अ‍ॅड.मनमोहन वाजपेयी, मंगेश डुके, विष्णू चांगदे या सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाºयांनी कुलगुरूंची भेट घेतली. यात पदवीधर महासंघ, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, सेक्युलर पॅनल यांचा समावेश होता.

तांत्रिक अडचणींमुळे पदवीधरांना हक्काच्या नोंदणीला मुकावे लागू शकते. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवडणुकांच्या वेळापत्रकाला फटका नाही.

याबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची प्रत विद्यापीठात जमा करता येऊ शकेल. या मुदतवाढीमुळे निवडणुकांच्या वेळापत्रकाला फटका बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.