Published On : Sat, Nov 10th, 2018

जनविरोधी भाजप सरकारला सत्तेतून बाहेर खेचाः खा.अशोक चव्हाण

नांदेड: विश्वासघातकी,जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली असून राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर हल्ला करत हे जनविरोधी सरकार सत्तेतून बाहेर खेचा असे आवाहन केले. तसेच माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस आपल्या घरी या अभियानांतर्गत प्रभाग क्र. 8 मधील अनेक मतदारांच्या घरी जावून त्यांच्या भेटी घेतल्या व पक्षाला मतदानासह भरीव आर्थिक मदत करा असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसजणांना संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आ. डी. पी. सावंत, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, शमीम अब्दुल्ला, विरेंद्रसिंघ गाडीवाले, नजीर अहेमद बाबा, किशोर भवरे, पप्पू पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, शंकर शिंदे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खा.चव्हाण पुढे म्हणाले की, युपीए व एनडीए या दोन सरकारची तुलना केली असता युपीए सरकार कामामध्ये सरस असल्याचे सहज दिसते. युपीएच्या काळात 5 लाख 30 हजार नवीन प्राथमिक शाळा सुरु करण्यात आल्या. तर मोदी सरकारने मागील दोन वर्षा 43 हजार शाळा बंद केल्या आहेत. शिक्षणावर युपीएच्या काळात 4.57 टक्के तर एनडीएच्या काळात 3.4 टक्के इतका खर्च केला आहे. युपीएने 60 हजार कोटी रुपयांचे शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले याचा फायदा देशातील 3 कोटी शेतकर्‍यांना मिळाला तर एडीएच्या काळात शेतकर्‍यांची कर्ज माफी झाली नाही. युपीएच्या काळात कृषी विकास दर 3.84 टक्के, एनडीएच्या काळात केवळ 1.83 टक्के इतका राहिला आहे. ग्रामीण मजुरी वृध्दीदर युपीएच्या काळात 19.66 टक्के तर एडीएच्या काळात 3.6 टक्के, युपीएच्या काळात इंदिरा आवास योजनेअंतर्गत 28.6 लाख तर एनडीएच्या काळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 16.66 लाख घरांचे बांधकाम करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असतानासुध्दा सरकारने अबकारी कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला नेऊन ठेवले आहेत. हे सरकार सर्वार्थांने जनविरोधी असून या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची आता वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष ते जनसंपर्क असा आंदोलनाचा व अभियानाचा टप्पा पार केला आहे. राज्यातील प्रत्येक घरामध्ये जावून काँग्रेसची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहंचविण्याचा जनसंपर्क अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत यांनी त्यांच्या भाषणातून सरकारने राबविलेल्या जनविरोधी धोरणाची चिरफाड केली. जनतेच्या मुळावर उठलेल्या या सरकारला आता मतदारच कंटाळले असून 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना आ. राजूरकर यांनी हे सरकार विश्वासघातकी, जुलमी व भ्रष्ट असल्याचे उदाहरणासह पटवून दिले. 2 कोटी युवकांना दरवर्षी रोजगार, महागाईवर नियंत्रण, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख आदी योजना केवळ चुनावी जुमला असल्याचे सांगतानाच दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील अत्याचारामध्ये मोठी वाढ झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला असून राफेल खरेदीमध्ये 40 हजार कोटींची दलाली झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष विजय येवनकर यांनी मानले. या कार्यक्रमात नगरसेविका सौ.मोहिनी येवनकर, नगरसेवक नागनाथ गड्डम, दुष्यंत सोनाळे, फिरोजभाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदिप सोनकांबळे,रुपेश यादव, प्रशांत सोनकांबळे, प्रकाश रोकडे, गोपी मुदीराज, श्रीनिवास भुसेवार, प्रशांत गड्डम, सचिन करवा, अमितकुमार वाघ, वैभव नालटे, माणिक हासेकर, अनिल कोकाटे, सन्मानभाई, बरकतभाई, नदीम, इम्रान खान, महमद रज्जाक, तिलक यादव आदींनी प्रयत्न केले.

त्यानंतर खा.अशोकराव चव्हाण यांनी शिवाजीनगर व आंबेडकरनगर भागातील संजय भंडारी, श्रीकांत गुंजकर, डॉ.प्रकाश पावडे,वसंत कोकाटे, गणेश कोत्तावर,त्र्यंबक कवटीकवार, नाथा बिडवई, शैलेस पूर्णेकर,लक्ष्मण शिंदे,संदिप जोंधळे, रेखा कांबळे, कमल गोडबोले, संदिप मगदे, सुषमा थोरात यांच्या घरांना जनसंपर्क अभियानांतर्गत भेटी दिल्या. नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी घराच्यापुढे शामियाने उभारुन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाला अनेकांनी आर्थिक मदत केली.