Published On : Fri, Feb 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राजकारणात खळबळ; पंजाबमधील जालंधर शहरातआप नेत्याची १६ गोळ्या झाडून निर्घृण हत्या

Advertisement

जालंधर – पंजाबमधील जालंधर शहरात शुक्रवारी पहाटे आम आदमी पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉडेल टाऊन परिसरात गुरुद्वाराबाहेर आपचे नेते लकी ओबेरॉय यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांची हत्या केली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले असून, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, लकी ओबेरॉय हे गुरुद्वाराबाहेर आपल्या थार गाडीत बसलेले असताना अचानक हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकूण १६ राउंड फायर केले, त्यापैकी ५ गोळ्या ओबेरॉय यांना लागल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. गोळ्यांचा आवाज ऐकून नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले, तर अनेक दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली.

गोळीबारानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत लकी ओबेरॉय यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून घटनास्थळावरून अनेक रिकाम्या काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक शत्रुत्व किंवा राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, लकी ओबेरॉय हे जालंधर कॅन्टचे प्रभारी राजविंदर कौर थियाडा यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली असून, या हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.