
नागपूर : शहरातील हिलटॉप लेआऊट परिसरात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. Nagpur येथील हिलटॉप लेआऊटमधील गोदावरी अपार्टमेंटसमोर असलेल्या कचरा संकलन स्थळी नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक नागरिकांना कचर्याच्या ढिगाऱ्यात नवजात बालिकेचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपासास सुरुवात केली.
यूपीएससी अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विभूती पानबुडे यांनी मृतदेहाची तपासणी केली. प्राथमिक पाहणीत ही प्रसूती अवघ्या दोन तासांपूर्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, बाळाची नाळ कापलेली नव्हती. यावरून प्रसूती नुकतीच झाली असून ती वैद्यकीय देखरेखीशिवाय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच जन्मानंतर अल्पावधीतच बालिकेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनास्थळी काही वैद्यकीय साहित्यही आढळून आले असून प्रसूती जवळच कुठेतरी करून नवजात बाळाला कचर्यात टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून स्थानिक नागरिकांचीही चौकशी केली जात आहे.
या अमानुष घटनेमुळे हिलटॉप लेआऊट परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








