महाकल्प आर्टिस्ट अॅकेडेमीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर: प्रत्येक कलाकारात एक कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे. ती संधी मिळाली तर तो मोठा कलाकार आपोआप होतो, असे मते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
महाकल्प आर्टिस्ट अॅकेडेमीच्या प्रदर्शनाचे ÷उद्घाटन चिटणवीस सेंटर येथे करताना ते बोलत होते. याप्रसंगी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विलास काळे, संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रामटेके, उपाध्यक्ष दीनानाथ पडोळे, सचिव भाऊ दांदडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- कलेसाठी आयुष्य अनेक कलाकारांनी दिले आहे. दीनानाथ पडोळे यांनीही कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. नवनवीन कलाकारांना संधी देण्याच्या उद्देशाने लिबर्टी पुलाखालील भिंतींवर व पिलरवर अनेक कलाकारांनी चांगली कलाकृती निर्माण केली आहे. आता मेट्रोच्या पिलरवरही अशाच चांगल्या कलाकृती निर्माण होतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कलाकार हा समर्पित भावनेने काम करतो. अनेक चांगल्या कलाकारांना चांगली संधी प्राप्त होत नाही, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- चित्रकार हा आपल्या कल्पकतेतून अनेक चांगल्या गोष्टी निर्माण करू शकतो. त्याला प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे.
सुरेश भट सभागृहात खालच्या भागात चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी जागा आहे. त्याची जबाबदारी संस्थेने घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लागणारी वीज आणि तेथील भाडे घेतले जाणार नाही. केवळ चित्र विकले गेले तर त्यातील 10 टक्के रक्कम मनपाला द्यावी लागेल, असचेही ना. गडकरी म्हणाले.