सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल समोर आला असून यात अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे दोन्हीही मिळाले आहेत. तर याप्रकरणी शरद पवारांना मोठा धक्का बसला. मात्र पहिल्यादांच त्यांनी माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिले म्हणून अस्तित्व संपत नाही असे शरद पवार म्हणाले. साताऱ्यात त्यांनी हे वक्तव्य केले.
पक्षातून लोक सोडून जातात, नवे येतात. या गोष्टी घडत असतात, मात्र असे कधी घडलेले नाही की ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्हही देऊन टाकले . हा निर्णय कायद्याला धरुन आहे असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे. दुसरे एक महत्त्वाचे तुम्हाला सांगतो चिन्ह गेलं तरीही त्याची चिंता करायची नसते. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती.
पहिल्यांदा बैलजोडी होती, नंतर गाय-वासरु आले, त्यानंतर चरखा हे चिन्ह आले. त्यानंतर हाताचे चिन्ह आले. त्यानंतर घड्याळ आलं. वेगळी चिन्हं आपण पाहिली आहेत. त्यामुळे कुणाला असे वाटत असेल की चिन्ह काढून घेतले म्हणजे त्या संघटनेचे अस्तित्व संपेल तर असे घडत नसते. सामान्य माणसांशी संपर्क वाढवला पाहिजे. त्यांना नवं चिन्ह काय आहे ते पोहचवले पाहिजे इतकंच महत्त्वाचे असते, अशी प्रतिक्रिया शरद पवार म्हणाले.