Published On : Tue, Jun 18th, 2019

पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभारावी : महापौर नंदा जिचकार

महापौर वृक्षमित्र, जलमित्र ओळखपत्रांचे वाटप : पर्यावरण रक्षणासाठी मनपाचा पुढाकार

नागपूर : सिमेंट रस्ते आणि विकासकामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत नागपूर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. यासोबतच भविष्यात नागपूर शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनाची जबाबदारीही काळाची गरज आहे. यासाठी पर्यावरणप्रेमी आणि जागरुक नागरिकांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी होईल आणि नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने वृक्ष आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात व्यापक कार्य व्हावे आणि जनजागृती व्हावी यासाठी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूर शहरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्यासाठी महापौर कार्यालयात नोंदणी केली. नोंदणी केलेल्यांना सोमवारी (ता. १७) महापौर कार्यालयात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका रूपा रॉय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, मेयर इनोव्हेशन कौन्सीलचे कन्वेनर डॉ. प्रशांत कडू उपस्थित होते.


पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेने वृक्ष आणि जलसंवर्धनासाठी पुढाकार घेऊन केलेल्या आवाहनाला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागपूर महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून वृक्षमित्र आणि जलमित्रांची जबाबदारी वाढली आहे. वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष जगविण्याचा संकल्प महत्त्वाचा आहे. शहरातील पाणीसाठा वाढविण्यात जलमित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन करीत यासाठी नागपूर महानगरपालिका आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

यावेळी उपस्थित वृक्षमित्र आणि जलमित्रांना महापौर नंदा जिचकार यांनी ओळखपत्रांचे वाटप केले आणि नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार असलेल्या विधायक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नागपूर महानगरपालिकेने दिलेल्या संधीचे सोने करू. वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करु, असा विश्वास वृक्षमित्र आणि जलमित्रांनी यावेळी दिला.