Published On : Wed, Oct 13th, 2021

शासकीय योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा – विमला आर.

Advertisement

कर्ज योजनेसाठी बचत गटाच्या महिलांना व्यवसाय समन्वयक नेमणार

नागूपर : विविध शासकीय महामंडळाद्वारे संचालीत कर्ज योजना, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच्या कर्ज योजना या प्राधान्यक्रम क्षेत्रातील अतिशय महत्वाचा घटक असून संस्था व उद्योजकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. केंद्र सरकारचा आशावादी उपक्रम ‘एक गाव एक समन्वयक ’ या योजनेच्या धर्तीवर कर्ज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बचत गटांच्या महिलांना व्यवसाय समन्वयक(बीसी सखी) म्हणून नियुक्त करण्यासाठी बँकांनी विशेष प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या.

केंद्र शासनाचा वित्तीय सेवा विभाग, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणात कर्ज व उद्योजकांसाठी सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संतोष एस., जिल्हा अग्रणी व्यवस्थापक पंकज देशमुख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध शासकीय महामंडळाद्वारे संचालीत कर्ज योजना, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कर्ज योजना, बचत गटासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनाबाबत जिल्हाधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

बँकांनी ग्राहकांच्या अपेक्षा जाणून त्याआधारे सेवा व उत्पादन क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्या. तसेच सर्व घटकांना कर्ज देताना त्वरित योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केल्या.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम वर्गीय उद्योजकांच्या विकासासाठी बँक ऑफ इंडिया नेहमीच कटिबध्द आहे. यामुळे उद्योजक तसेच बँक यांची प्रगती होण्यास मदत होईल. नागपूर जिल्ह्यातील उद्योजकांनी सर्व शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संतोष एस. यांनी यावेळी केले. तसेच कर्ज खात्याच्या नियमित परिचालनासाठी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

दोन दिवसीय कर्ज मेळाव्यास सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी, शासकीय महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकज देशमुख यांनी मानले.