Published On : Wed, Apr 28th, 2021

सम्राट अशोकाचे बौद्ध धर्म विषयक कार्य चर्चासत्र संपन्न !

Advertisement

रामटेक : श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्यावतीने सम्राट अशोकांनी बौद्ध धर्मासाठी केलेले कार्य या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस. के.पोरवाल कॉलेज कामठीचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र तागडे हे होते. याप्रसंगी सम्राट अशोकाच्या बौद्ध धर्माविषयी कार्याची माहिती देताना डॉ. जितेंद्र तागडे यांनी सांगितले की सम्राट अशोकाने आपल्या राज्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी लावली होती. राज्यातील लोकांचे जीवन हे नैतिक,सुखी समाधानी व्हावे यासाठी त्यांनी स्वतंत्र पदाची निर्मिती केली होती. स्वतःच्या सुखासाठी कोणत्याही सोयीसुविधा न करता धर्मयात्रांचे आयोजन त्यांनी केले होते. धर्माच्या प्रसार,प्रचारासाठी स्वतःचा मुलगा महेन्द्र व मुलगी संघमित्रा यांना परदेशात पाठवले.

जागोजागी विहारे, स्तूप यांचे बांधकाम केले. पाटलीपुत्र येथे तृतीय धर्म परिषद आयोजित केली. त्यांनी आपल्या साम्राज्यात पशुबळी व मद्यपान बंदी आणली.त्यांच्या या कार्याचा उल्लेख अनेक शिलालेखात आढळतो.

अध्यक्षीय भाषणातून डॉ.संगीता टक्कामोरे यांनी सम्राट अशोकाचे कार्य हे आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे सांगून शांतता आणि सुव्यवस्थेचा आदर्श सम्राट अशोकाकडून घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुनील कठाणे यांनी केले.उपस्थितांचे आभार श्रीकांत भोवते यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.नरेश आंबिलकर,प्रा. अमरीश ठाकरे, प्रा. स्वप्निल मनघे, प्रा. नितीन घमंडी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला अनेक प्राध्यापकांनी तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन हजेरी लावली होती.