Published On : Tue, Aug 27th, 2019

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बेरोजगारी विरोधात एल्गार

दीड तास रोखून धरला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे…

पुणे: बेरोजगारीच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आक्रोश मोर्चा काढत दीडतास मुंबई – पुणे एक्स्प्रेस रोखून धरला.महाराष्ट्रातील बेरोजगारीने होरपळणाऱ्या तरुणांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर आंदोलन करण्यात आले.

शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात असतानाही तब्बल दीड तास युवकांनी एक्स्प्रेस हायवे रोखून धरला.यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने वेळोवेळी आवाज उठवण्यात आलाय. मात्र, कुंभकर्णाची झोप लागलेल्या सरकारने राज्यातील वाढत्या बेरोजगारीवर काहीच तोडगा काढला नाही.

उलट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी २ कोटी रोजगार उपलब्ध करू तसेच प्रशासन विभागात मेगा भरती करू अशी आश्वासने मुख्यमंत्री महोदयांनी दिली होती. मात्र भाजपात पक्षप्रवेशाची मेगाभरती होताना दिसत असल्याची टीका मेहबूब शेख यांनी यावेळी बोलताना केली.