मुंबई : इलोक्टोरल बाँडवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ईडी, सीबीआय भाजपाचे वसुली एजंट म्हणून काम करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी वसुली एजंट म्हणून काम करत भाजपाला निवडणूक रोखे जमा करून देण्यात मदत केली. ज्या केंद्रीय तपास यंत्रणांनी, अधिकाऱ्यांनी भाजपासाठी काम केले, त्या सर्वांची चौकशी भाजपाचे सरकार गेल्यानंतर करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि पाठिंबा देतो, असे विधान संजय राऊत यांनी केले.
आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक रोखे या विषयावर त्यांनी भाजपावर टीकास्र सोडले.निवडणूक रोख्यांचा हजारो कोटींचा घोटाळा समोर आला आहे.
भाजपाला ४०० जागा हव्या आहेत, कारण त्यांना संविधान बदलायचे आहे. संविधान बदलल्यानंतर ते भ्रष्टाचारालाही शिष्टाचारात बदलतील. जसे निवडणूक रोख्याच्या योजनेला त्यांनी कायद्याचा आधार दिला होता. महात्मा गांधी फादर ऑफ नेशन होते, पंतप्रधान मोदी फादर ऑफ करप्शन आहेत, अशा शब्दत राऊत यांनी निशाणा साधला.
धंद्याच्या बदल्यात चंदा या माध्यमातून हजारो कोटींचा काळा पैसा निवडणूक रोख्याच्या माध्यमातून दिला गेला. ज्या कंपनीचे उत्पन्नच १५० कोटी आहे, ती कंपनी ३०० कोटींचा निधी देते. याचा अर्थ या कंपन्यांना कुणीतरी काळा पैसा दिला, जो निवडणूक रोख्याच्या माध्यमातून देण्यात आला.
देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आला आहे, त्यातून “सिर्फ मै खाऊंगा…” हा मोदींचा नवा संदेश गावागावात गेला आहे. ‘ना खाऊंगा और न खाने दुँगा’, असे मोदी एकेकाळी म्हणाले होते. पण आता ‘मै और मेरे लोग खायेंगे’ हा नवा संदेश आता सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे. भाजपाचे सरकार हा देशाला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक निवडणुकीतून धुवून काढावा लागेल.निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा ४०० पार नाहीतर तडीपार होणार,अशी टीका संजय राऊत यांनी केली.