Published On : Tue, Jun 19th, 2018

मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणूक

Advertisement

मुंबई : शिक्षक मतदार संघातील उमेदवार आमदार कपिल पाटील यांची कोंडी करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरुन शिक्षणमंत्री विनोद तावडे खटाटोप करताना दिसत आहेत. शिक्षक परिषदेला डावलून, त्यांची नाराजी ओढवून घेत तावडे यांनी स्वतःचा उमेदवार अट्टहासाने निवडणुकीत उतरविला आहे. तावडेंचे उमेदवार अनिल देशमुख यांना भाजप आणि शिक्षक परिषदेच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.

कपिल पाटील यांनी खाजगी विद्यापीठ आणि शाळांच्या कंपनीकरणाच्या बिलाला विधान परिषदेत एकाकी विरोध केला होता. आधी खाजगी विद्यापीठाचं बिल त्यांनी रोखून सरकारला अडचणीत आणलं होतं, नंतर शाळांच्या कंपनीकरणाचं बिल गेली दोन अधिवेशनात त्यांनी रोखून धरल आहे. खाजगी विद्यापीठ, शिक्षणाचं बाजारीकरण करु पाहणारी कार्पोरेट लॉबी आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाचे समर्थक सत्ताधारी-विरोधी पक्ष यांना एकाच वेळी कपिल पाटील यांनी विरोध करुन दुखावलं असल्याने त्यांच्यावर या लॉबीची वक्रदृष्टी आहे. ही कॉर्पोेरेट लॉबी या निवडणुकीत कपिल पाटलांना एकाकी पाडण्याचा डाव खेळत आहेत. तावडे त्या लॉबीचे प्रतिनिधी आहेत.

तावडेंना पुढे करुन ही लॉबी डावपेच आखत आहे. कपिल पाटील खाजगी विद्यापीठ आणि शाळांचं कंपनीकरण ही बिलं अडवत होते तेव्हा भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधी पक्ष ही संगनमत करत असत. असं संगनमत करुन या सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी खाजगी विद्यापीठाचं बिल पास केलं होतं. हा इतिहास बघता या शिक्षक निवडणुकीत कपिल पाटील यांची एक प्रकारे कोंडी करायची यासाठी तावडेंनी कंबर कसली आहे. कपिल पाटील यांच्या विरोधात सुरुवातीला शिक्षक परिषदेने उमेदवार निवडणुकीत उतरवला होता. पण हा उमेदवार मतं मिळवू शकणार नाही हे लक्षात येताच तावडेंनी हस्तक्षेप करुन अनिल देशमुख हा बाहेरचा उमेदवार भाजपामध्ये आणला. त्याला भाजपाची उमेदवारी द्या, असा आग्रह धरला पण भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी मतदार संघात चाचपणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, देशमुख कपिल पाटील यांच्याशी लढाईत टिकू शकणार नाही. ते हरतील आणि भाजप हरला म्हणून नामुष्की वाट्याला येईल. ही नामुष्की टळावी म्हणून भाजपाने देशमुख यांना उमेदवारी न देता पुरस्कृत केले. भाजप श्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याने देशमुख हे भाजपाचे नव्हे तर तावडेंचे उमेदवार आहेत असं स्पष्ट झालंय.

भाजप श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे दुखावलेल्या तावडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राज्य अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विषयी नागपूरला तक्रार केल्याचं कळतंय. तावडे हट्टाला पेटून देशमुखांसाठी मैदानात उतरलेत. पण त्यांची प्रतिमा शिक्षक विरोधी आहे. गेल्या चार वर्षात त्यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केला. शिक्षकांचे पगार भ्रष्ट बँकेत पळवण्याचा प्रयत्न करुन शिक्षकांचा छळ केला. त्यामुळे मुंबईतले शिक्षक, शिक्षणसंस्थाचालक संतापलेले आहेत. हा संताप या निवडणुकीत त्यांना भोवणार असं बोललं जातंय.

शिक्षणाचं खाजगीकरण करणारी कार्पोरेट लॉबी, सत्ताधारी वर्ग तावडेंना पुढे करुन कपिल पाटील यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असला तरी कपिल पाटील यांना शिक्षकांची असणारी सहानुभूती ही त्यांची जमेची बाजू ठरणार आहे.