
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग अखेर वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. यानुसार राज्यात २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या यादीत १५ नव्या नगरपंचायतींचाही समावेश करण्यात आला आहे.
घोषणेनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांतील गोंधळाचा मुद्दा उचलला आहे. महाविकास आघाडी आणि मनसे यांनी आधीच दुबार मतदारांबाबत आक्षेप घेत “प्रथम मतदार यादी शुद्ध करा आणि मगच निवडणुका घ्या,” अशी मागणी केली होती. मात्र, आयोगाने हा आक्षेप नाकारत निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘डबल स्टार’ नावाचा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या तंत्रज्ञानाधारित प्रणालीद्वारे दुबार मतदार ओळखले जाणार आहेत. ज्या मतदाराचं नाव यादीत दोन ठिकाणी आढळेल, त्याच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह दिसेल. त्यानंतर स्थानिक प्रशासन त्या मतदाराची नाव, फोटो, पत्ता आणि लिंगाची पडताळणी करेल. यामुळे तो मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करेल हे निश्चित केलं जाणार आहे.
जर मतदाराच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह असेल आणि त्याने इतरत्र मतदान केलं नसल्याचं सांगितलं, तर त्याच्याकडून आयोगाने तयार केलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही घेतली जाईल. त्यात तो नमूद करेल की “मी या केंद्राशिवाय कुठेही मतदान केलेले नाही आणि करणारही नाही.”
राज्य निवडणूक आयोगाचा हा ‘डबल स्टार’ उपक्रम सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आयोगाचा दावा आहे की या प्रणालीमुळे दुबार मतदारांची संख्या कमी होईल, मतदान प्रक्रिया पारदर्शक बनेल आणि लोकशाही अधिक मजबूत होईल.









