| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 18th, 2020

  वृद्ध, रुग्ण यांचे केअरटेकर यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कुठलेही निर्बंध नाही

  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती

  नागपूर: कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शासन निर्देशांच्या अनुषंगाने काही निर्बंधामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वृद्ध आणि रुग्णांच्या सुविधेच्या दृष्टीने त्यांच्या केअरटेकरसाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सेवा देण्यास कुठलेही निर्बंध आखण्यात आले नसल्याचेही स्पष्ट केले.

  लॉकडाउनचा पहिला टप्पा सुरू झाला तेव्हापासून शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करत बहुतांश सोसायटी आणि घराघरांमध्ये घरकामासाठी येणा-या महिला आणि पुरूषांनाही सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी तसेच सोसायट्यांनी स्वत:हून रजा दिली होती. दरम्यान लॉकडाउनचा चवथा टप्पा ३१ मे पर्यंत राज्य शासनाने वाढविला असला तरी स्थानिक प्रशासनाने काही बाबींसाठी शिथिलता आणली आहे. यात खाजगी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांनाही नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्याचे आदेश काढले. यामुळे दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

  दरम्यान घरकामांना येणा-या घरगड्यांबाबत ब-याच नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक सोसायट्यांनी स्वत:हून घरगड्यांबाबत टाकलेले निर्बंध हटविले नाही. यासंदर्भात स्पष्टता आणताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, घरकामासाठी किंवा रुग्ण, वृद्ध यांचेसाठी केअरटेकर ठेवण्याबाबत मनपा प्रशासनाने निर्बंध लावण्याबाबत कोणतेही आदेश काढलेले नाही. घरगड्यांना कामावर बोलावणे अथवा न बोलावणे हा निर्णय पूर्णपणे संबंधित घरप्रमुख किंवा सोसायट्यांचा आहे. यात फक्त एकाच बाबतीत दक्षता घ्यायची आहे की, नागपूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरकामास जाणार नाही. अथवा प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील कुठलीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात घरकामास जाउ शकणार नाही.

  प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या व्यक्तीला प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलच घरी अथवा सोसायटीमध्ये घरकामावर बोलविण्यास कुठलिही हरकत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून कामावर येताना हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती राहतात. त्यांना जीवन जगणे सुकर व्हावे व दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होउ नये यासाठीही सोसायट्यांनी घरकाम करणा-या व्यक्तींना खबरदारीचे सर्व नियम पाळून सोसायटीमध्ये प्रवेश देण्यास हरकत नाही, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145