
पुणे : शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना तशी संधी भाजप देणार नाही,” असा थेट दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
शिंदेंना मुख्यमंत्री का केले?
राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आमचे दीर्घकाळ सहकारी होते. मात्र शिवसेना फोडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. “हा निर्णय वैचारिक नव्हता, तर राजकीय डाव होता,” असा आरोप त्यांनी भाजप वर केला.
सर्वोच्च न्यायालयावरही भाष्य-
राऊत यांनी न्यायव्यवस्थेबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले. काही न्यायाधीश सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला पूरक पद्धतीने काम करतात, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी तेथील सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत, न्यायसंस्थेतील पक्षपाताबाबत प्रश्न उपस्थित केले.
भाजपाकडे ठोस विचार नाही-
राऊत यांनी पुढे सांगितले की, विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते; मात्र भाजपाकडे ठोस राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक विचारसरणी नाही. “दबाव आणून, चौकशा लावून नेत्यांना पक्षांतरास भाग पाडले जाते,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी अजित पवार, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक यांची उदाहरणे दिली.
हणमंत पवार प्रकरणाची पार्श्वभूमी-
पुण्यातील हणमंत पवार मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे वक्तव्य केले. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.राऊत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








