Published On : Fri, Nov 15th, 2019

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – पवार

Advertisement

– सोमवारपासून संसदेचे अधिवेशन;अर्थमंत्रालयात संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेणार,नागपूरसह इतर जिल्हयात शेतकर्‍यांच्या पिकांचे अभूतपूर्व नुकसान

नागपूर -नागपुर आणि इतर जिल्हयात अतिवृष्टीमुळे संत्र्यांसह इतर पिकांचे अभूतपूर्व असे नुकसान झाले असून संसदेच्या अधिवेशनात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल केंद्राच्या कृषीमंत्रालयात बैठक घेऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.

नागपुरमधील संत्री, मोसंबी, सोयाबीन, कपाशी , धान, ज्वारी आणि अन्य पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जात करुन आणि त्यांना दिलासा देत आज शरद पवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

१४ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्हयातील काटोल विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी शरद पवार यांनी केली.

विदर्भातील जी काही महत्वाची पिकं आहेत त्यांचे
नुकसान झाले आहे. त्यामध्ये फळबागांमध्ये संत्री, मोसंबी यांच्यावर परिणाम आहे. धानाचे पीक आहे त्यावर परिणाम झाला आहे. कपाशी, सोयाबीन, ज्वारी आहे. अभूतपूर्व असे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये संत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नुकसानीची आकडेवारी पेक्षा जास्त शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे आणि ती आकडेवारी मोठी आहे.

अतिवृष्टीमुळे संत्र्यांवर गळ नावाचा रोग झाला आहे. यामुळे संत्री, मोसंबीची फळं गळून पडत आहे. ६० ते ७० टक्के फळं गळून पडली आहेत. त्याचा आता काही उपयोग नाही. तो वेचून काढायला आणखी खर्च येतो. अशा संकटात संत्रा उत्पादक सापडला आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.

मोसंबी आणि संत्र्यावर एक रोग येतो त्याला ड्रायबॅक म्हणतात. यामध्ये पाने सुकुन गळून पडतात आणि हाच रोग या पिकांवर आलेला आहे असे सांगतानाच या सर्व उत्पादकांना काय आणि कशी मदत करता येईल अशी पाऊले टाकली जातील आणि राज्यसरकारचे प्रतिनिधी सुद्धा बोलावून या नुकसानीला सामोरे जाताना यंत्रणा कशी उभारावी याची चर्चा या बैठकीत केली जाणार आहे अशी माहितीही शरद पवार यांनी यावेळी दिली.

शेतकर्‍यांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये दोन भाग असून शेतकर्‍यांनी बॅंकचे कर्ज काढले आहे आणि पीक गेले आहे. मात्र कर्ज डोक्यावर तसेच राहिले आहे. त्यांना कर्जमाफी मिळणे आणि दुसरा भाग कर्जमाफीशिवाय समजा कर्जमाफी झाली आणि यंदाच्या वर्षातील पीक गेल्यानंतर पुढच्या वर्षीचं पीक घेण्यासंदर्भात भांडवली गुंतवणूक कुठुन करायची त्यासाठी केंद्र सरकारकडून,अर्थ मंत्रालयाकडून काही रक्कम मदतीसाठी शुन्य व्याजाने किंवा कमी व्याजाने, दिर्घ हप्त्याने देणं शक्य आहे का हाही प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी अर्थमंत्रालयासोबत बैठक घेण्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान नुकसान झालेल्या पिकांमध्ये केंद्रसरकारनेच लक्ष घातले पाहिजे असा आमचा आग्रह राहिल असेही शरद पवार म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या इतर प्रश्नांना शरद पवार यांनी अगदी दिलखुलास उत्तरे दिली.