Published On : Fri, Jul 31st, 2020

डिमांड वितरणाला गती देऊन महसूल वाढीसाठी प्रयत्न करा : स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके

Advertisement

विविध विभागाच्या वसुलीबाबत घेतला आढावा

नागपूर : विविध विभागाकडून मिळणारे उत्पन्न हेच नागपूर महानगरपालिकेच्या महसूल प्राप्तीचे स्त्रोत आहे. मनपाचे महसूल वाढीसाठी डिमांडच्या वितरणाला गती देऊन जास्तीत जास्त महसूल वाढीसाठी प्रयत्न करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.

मनपाच्या उत्पन्न वाढीसंदर्भात शुक्रवारी (ता.३१) स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी मालमत्ता कर, नगररचनाविभाग आणि स्थानिक संस्था कर या विभागाच्या वसुलीबाबत आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभापती कक्षात झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह सत्ता पक्षनेता संदीप जाधव, प्रभारी उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, सहा. संचालक नगररचना प्रमोद गावंडे उपस्थित होते.

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे सुमारे चार महिने मनपाचे सर्व उत्पन्नाचे स्त्रोत जवळपास बंद होते. विविध विभागाकडून प्राप्त होणारे महसूल हेच मनपाचे मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे पुढील काळात महसूल वसूली सुरळीत व्हावी आणि त्यात वाढ व्हावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. या संदर्भात आवश्यक कार्यवाहीला गती देवून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही स्थायी समिती सभापतींनी यावेळी अधिका-यांना दिले.