Published On : Tue, Apr 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रभावी पाऊल; पोलीस आयुक्त सिंगल फूट पेट्रोलिंग करत स्वतः उतरले रस्त्यावर !

Advertisement

नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी रात्री 8 ते 10 या वेळेत शहरातील विविध ठिकाणी अचानक फूट पेट्रोलिंग करत स्वतः मैदानात उतरून पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली, तर सामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना उमटली.

सीताबर्डी, सदर, तहसील आणि पाचपावली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी प्रमुख वर्दळीची ठिकाणे जसे की मेश्राम चौक, एलआयसी चौक, रेल्वे स्टेशन, ज्येष्ठ चौक, मोमीनपुरा, नाईक तलाव, खाटीक चौक, आणि गड्डीगोदाम परिसरात पायदळ पेट्रोलिंग करत स्थितीचा आढावा घेतला.

Gold Rate
19 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000/-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,98,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुन्हेगारीवर वचक आणि वाहतूक सुधारणा-
गड्डीगोदाम परिसरात वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी अनधिकृत वाहने, उभ्या असलेल्या गर्दीचे निरीक्षण केले. सीताबर्डीतील व्हेरायटी चौक व मेन रोडवर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांविरोधात कारवाईचे आदेश देत, वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला.

गुन्ह्याच्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट-
पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील नंदगिरी रोडवरील खून प्रकरणाच्या घटनास्थळी त्यांनी भेट देत तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि स्थानिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. यावेळी परिसरातील विविध भागांमध्येही त्यांनी फूट पेट्रोलिंग करत नागरिकांशी थेट संवाद साधला.

युवकांशी संवाद आणि वाचनालयाची घोषणा-
स्वसंरक्षणासाठी सराव करणाऱ्या तरुणींशी संवाद साधताना चैताली पवनीकर या विद्यार्थिनीने आपली आयएएस अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. परिसरात अभ्यासासाठी लायब्ररीची गरज असल्याचे सांगितल्यावर, डॉ. सिंगल यांनी त्वरित वाचनालय उभारण्याचे आदेश दिले आणि त्याच्या प्रगतीची माहिती स्वतःला कळवण्यास सांगितले.

गुन्हेगारी नियंत्रणासाठी स्पष्ट निर्देश-
पोलीस आयुक्तांनी तपास पथक, डीबी पथक, गुप्तचर शाखा यांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले. विशेषतः लहान मुली व महिलांच्या सुरक्षेवर भर देत, गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सांगितले.

कम्युनिटी पोलीसिंगचा आदर्श नमुना-
डॉ. सिंगल यांनी केवळ गुन्हेगारांवर वचक ठेवण्याऐवजी, वस्तीतील युवकांना प्रेरणा देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रत्यक्ष भेटींमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत दररोज अशाच पेट्रोलिंगची अपेक्षा व्यक्त केली.

या फूट पेट्रोलिंगमुळे एकीकडे पोलिसांमध्ये कार्यक्षमता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, तर दुसरीकडे नागरिकांच्या मनात पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांची ही मैदानात उतरून केलेली कार्यपद्धती नागपूरसारख्या शहरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी नक्कीच प्रभावी ठरेल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement