| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 7th, 2018

  शिक्षण मंच-अभाविपचा नागपूर विद्यापीठात दणदणीत विजय

  नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघात शिक्षण मंच- अभाविपला रोखण्यासाठी साकारण्यात आलेल्या महाआघाडीचा फॉर्म्युला फेल ठरला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या ७ निकालापैकी ५ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले.

  रविवार ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये केवळ ४१.१६ टक्के मतदान झाले. सात वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटल्याने उमेदवारांचे ठोकेही वाढले होते. खुल्या प्रवर्गातील ५ व आरक्षित प्रवर्गांमधील ५ अशा एकूण १० जागांच्या मतमोजणी प्रक्रियेला मंगळवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत मतपत्रिकांची छाननीच चालली व त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ‘शिक्षण मंच-अभाविप’ने आघाडी घेतल्याचे चित्र होते. आरक्षित गटातील ५ जागांपैकी ४ जागांवर शिक्षण मंच-अभाविपच्या उमेदवारांनी विजय मिळविला. यात सुनील खंडारे (एससी), दिनेश शेराम (एसटी), वामन तुर्के (व्हीजेएनटी), वसंतकुमार चुटे (ओबीसी) यांचा समावेश होता.

  महिला प्रवर्गात विद्यापीठ संग्राम परिषदेच्या सरिता महेंद्र निंबर्ते या विजयी झाल्या. खुल्या प्रवर्गातून संग्राम परिषदेचे अ‍ॅड.मनमोहन वाजपेयी तर शिक्षण मंच-अभाविपचे प्रवीण उदापुरे यांनी विजयी मतांचा कोटा पूर्ण करीत यश संपादित केले. विद्वत् परिषदेतील यशानंतर यंग टीचर्सचे डॉ.बबनराव तायवाडे, सेक्युलर पॅनेलचे संयोजक अ‍ॅड.अभिजित वंजारी, संग्राम परिषदेचे किरण पांडव आणि महेंद्र निंबर्ते यांच्या पुढाकाराने महाआघाडी साकारण्यात आली होती, हे विशेष.

  हजारांहून अधिक अवैध मते
  प्राधिकरण निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे पदवीधर गटाच्या निवडणुकांमध्येदेखील अवैध मतांचे प्रमाण जास्त दिसून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हजारांहून अधिक मते अवैध ठरली. यासंदर्भातील नेमकी आकडेवारी मतगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच सांगता येईल, अशी माहिती कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.

  परिवर्तनचा महाआघाडीला फटका
  या निवडणुकांमध्ये तरुण उमेदवारांचा समावेश असलेल्या परिवर्तन पॅनलने प्रस्थापितांना धक्का दिला. आरक्षित गटात त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. परंतु त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते घेतली. आरक्षित गटातील ५ जागांपैकी ४ ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. परिवर्तनमुळे महाआघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले.

  विद्यापीठात अभाविपचा जल्लोष
  दरम्यान, विद्यापीठात शैक्षणिक संघटनांसोबतच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. शिक्षण मंच-अभाविपला मिळालेले यश आणि महाआघाडीच्या पदरी आलेले अपयश यामुळे अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी कार्यकर्त्यांनी विद्यापीठात घोषणाबाजी करत जोरदार जल्लोष केला.
  विजयाची खात्री होतीच : कल्पना पांडे
  विद्यापीठात आम्ही जी कामे केली आहेत त्याची पावतीच आज मतदारांनी दिली आहे. पदवीधरांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच काम करतो. त्यामुळे विजयाची खात्री होतीच, असे मत विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे यांनी व्यक्त केले.

  कडेकोट सुरक्षा व्यवस्था, तरीही सावळागोंधळ
  नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांच्या मतमोजणीसाठी यंदा कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. विद्यापीठाने सुरुवातीला केवळ उमेदवार किंवा त्यांचा एक प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते व त्या दृष्टीने पासेसदेखील वाटण्यात आले. मात्र दुपारनंतर कुणाचाही पास कुणीही घेऊन फिरताना दिसून आले. एकदा मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर अनेक जण तेथेच घुटमळताना दिसून आले.

  सकाळपासून राबला कर्मचारीवर्ग
  दरम्यान, मतमोजणीसाठी विद्यापीठातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली होती. सकाळी ९ वाजल्यापासूनच सर्वजण कामावर होते व मध्यरात्रीनंतरदेखील काम सुरूच होते. विशेष म्हणजे महिला कर्मचारीदेखील कार्यरत होता. उपकुलसचिव वसीम अहमद, अनिल हिरेखण, मनीष झोडापे, बी.एस.राठोड, अर्चना भोयर, गजानन उतखेडे , सुधाकर पाटील, गणेश कुमकुमवार, रमण मदने, प्यारेलाल मरार, वीणा दाढे, यांच्या नेतृत्वात मतगणना पार पडली. मतमोजणीसाठी निरीक्षक म्हणून डॉ. श्रीकांत कोमावार, डॉ. सी.डी. देशमुख, डॉ.जी.एस. खडेकर यांनी काम पाहिले. निवडणूक कक्षाचे समन्वयक म्हणून एस.एस.भारंबे यांच्याकडे जबाबदारी होती. तर मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.
  विजयी उमेदवार
  प्रवर्ग उमेदवार
  ओबीसी वसंतकुमार चुटे
  एससी सुनील खंडारे
  एसटी दिनेश शेराम
  व्हीजेएनटी वामन तुर्के
  महिला सरिता निंबर्ते
  खुला अ‍ॅड.मनमोहन वाजपेयी
  खुला प्रवीण उदापुरे

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145