नागपूर: विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रासह देशभरात ईडी या तपासयंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ईडी ही यंत्रणा भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे असा गंभीर आरोप शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर केला आहे. सध्या आम्ही निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल त्याची वाट पाहतो आहोत असेही ते म्हणाले.
या देशातील एजन्सींचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या घडीला ईडी, सीबीआय इतर एजन्सींचा वापर ठिकठिकाणी गैरवापर केला जातो आहे. कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ माणसाच्या संदर्भात कारवाई झाली. अटक करण्यात आली. डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. एखाद्या राज्यातला इतका वरिष्ठ नेता त्याला अटक करणं, कोर्टाने त्याला सोडणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर केला जात आहे.
ईडी ही संस्था भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे. भाजपाचे नेते आधीच सांगतात की अमुक नेत्यावर कारवाई होणार आहे आणि तशी ती कारवाई घडते. ईडीचे अधिकारी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतात की भाजपाच्या कार्यालयातून हेच कळत नाही असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.