हिंगोली: मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात आज सकाळी ६.०८ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंदी ४.५ असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक घरांना या भूकंपामुळे तडेही गेले. या घटनेमुळे नागरिक भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीपोटी नागरिक पळून घराबाहेर आले.
अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. घरे अक्षरक्ष: हलू लागली होती. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ येथे आज सकाळी दोन वेळा भूकंपाचे हादरे बसले. पहाटे ६ वाजून ८ मिनिटांनी पहिला धक्का, तर ६ वाजून १९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला.
येथील सिरळी गावात भूकंपामुळे काही घराच्या भिंतींना तडे गेले. ४.२ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तसेच जीवित हानी झाली नसल्याची माहिती दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटरवर अंतरावर होता.
दुसरीकडे परभणी जिल्ह्यातही सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणत्याही नुकसानीची नोंद नाही. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यात असून ६० किलोमीटर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच नांदेड शहर आणि काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात १/५ रिष्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.