वर्धा – वडोदरा, गुजरात येथील ॲलेम्बिक फार्मास्युटीकल्स कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटअंतर्गत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीच्या आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ॲलेम्बिक फार्मा ही औषधी निर्माण क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी असून या कंपनीद्वारे दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता.
यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत बी.फार्म. अंतिम वर्षातील मयूर धपकस, तेजस भुजाडे, तेजस बुरीले, स्वागत बुरीले, शिवम मुडे, आदित्य आगलावे, गौरव खंडाळकर आणि मयंक टिपले या आठ विद्यार्थ्यांची निवड ॲलेम्बिकच्या प्रतिनिधी मंडळाद्वारे करण्यात आली. या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व साडेतीन लाखाचे वार्षिक पॅकेज ॲलेम्बिकद्वारे देण्यात आले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, प्राचार्य डॉ. अनिल पेठे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. दीपक खोब्रागडे, उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र अग्रवाल, कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमाच्या संयोजक प्रा. शिवानी माखिजानी यांनी आगामी वाटचालीसाठी सदिच्छा देत अभिनंदन केले आहे.